मानवत : अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत राज्यकारभार करणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली असे प्रतिपादन परभणी येथील ज्ञानसाधना पुस्तकालयाचे रावजी लुटे यांनी केले.
शिक्षक पालक संघाच्या वतीने आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेत लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शारदा कच्छवे होत्या. पुढे बोलताना लुटे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर घाट व मंदिराची उभारणी केली. त्यामागे केवळ धार्मिक हेतू नव्हता तर हजारो मजुरांना पोटापाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून काम दिले. त्यासोबत संस्कृतीचे संवर्धनही केले.
हा सर्व खर्च त्यांनी राजकीय कोशातून न वापरता स्वत:च्या खासगी मालमत्तेतून केला. स्वत: साधेपणाने जगून राजकोष राष्ट्रकार्यासाठी वापरले. सैनिकांच्या विधवांना विनकाराचे प्रशिक्षण देऊन जगप्रसिद्ध माहेश्वरी साडीचे उत्पादन, वितरण व विक्री केली. नाईलाजाने गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेल्या भिल्ल जमातीमधील युवकांना शिक्षा न करता त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्यातील अंगभूत शौर्य व प्रामाणिकपणा या गुणांचा उपयोग करून मार्ग संरक्षण व चौकांची पहारीदारी दिली.
त्यामुळेच लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेच नामाभिधान सार्थ ठरते. सूत्रसंचालन कीर्ती कत्रूवार यांनी तर आभार छाया मुंदडा, शोभा कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक पालक संघाच्या अध्यक्ष डॉ. शरयू खेकाळे, शोभा कुलकर्णी, छाया मुंदडा, कीर्ती कत्रूवार, प्रा. शारदा कच्छवे, लता भरड, अरुणा करपे, प्रा. रुपेश देशपांडे, उदयकुमार जैन, डॉ. संजय मुंदडा, अनंत गोलाईत, प्रकाश करपे, श्रीकांत माकुडे, अक्षय कत्रूवार, प्रसाद जोशी यांनी परिश्रम घेतले. तीन दिवसीय व्याख्यानमलेत वक्त्यांना पुष्पहार देण्याऐवजी ग्रंथ व आंब्याची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. शिवराज सेवाभावी संस्थेचे संस्थापक आप्पा चिंचोळकर यांनी नि:शुल्क रोपे उपलब्ध करून दिली.