परभणी : अतिरिक्त आयकर आयुक्त (सूट) रेंज -१, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वस्त संस्थांसाठी जनजागृती कार्यक्रम दि. २९ ऑक्टोबर रोजी जी.एस.टी. भवन, परभणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास सनदी लेखापाल, आयकर सल्लागार, विश्वस्त तथा वकील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आयकर अधिकारी नांदेड संजय इंगोले यांनी प्रास्तविकेद्वारे या कार्यक्रमाचे महत्व सांगितले. विवाद से विश्वास (व्हीएसव्ही) ही योजना करदात्यांच्या प्रलंबित प्रत्यक्ष कर विवादला सोडविण्यासाठी कशाप्रकारे मदत करू शकते आणि या योजनेनुसार करदाता अपील, रीट याचिका तसेच अनुमती याचिका यांचा कशा प्रकारे निपटारा करू शकते या बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.
त्या नंतर सनदी लेखापाल अरविंद निर्मल यांनी आयकर कायद्याचे महत्व तसेच त्यातून होणारे फायदे आणि आयकर कायद्याचे उल्लंघन केल्यावर होणारे दुष्परिणाम या विषयी विस्तृत माहिती दिली. तसेच एक ट्रस्टी म्हणून काय-काय जबाबदा-या असतात या बद्दल जागृती केली आणि आयकर कायद्याचे कलम ११५ टीडीनुसार ट्रस्ट होणारी कठोर कारवाई या विषयी माहिती दिली. आयकर उपायुक्त (सूट) रंिवद्र चव्हाण यांनी ट्रस्ट संदर्भातील महत्वपूर्ण तरतुदी बद्दल विस्तृत माहिती दिली. विविध देय तारीख नुसार ट्रस्टने विवरण पत्र आणि ऑडिट अहवाल वेळेत सादर करावे व सेक्शन ११ नुसार सूट घ्यावी असे नमूद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी अतिरिक्त आयकर आयुक्त (सूट) तथा रेंज-१ छ. संभाजीनगर हर्षित बारी यांनी ट्रस्ट संबंधित असलेले बारकावे सांगितले तसेच ईमेल आयडी अद्यावत करावे जेणे करून कर अनुपालन व्यवस्थित होईल या बद्दल ची महत्पुर्ण माहिती सांगितली. करदात्यांनी त्याच्याकडील थकीत देय कराची रक्कम वेळेत भरून आयकर विभागामार्फत होणारी कायदेशीर कार्यवाही टाळावी असे सूचित केले. प्रेक्षकांनी ज्या अडचणी या कार्यक्रमांतर्गत मांडल्या त्यांचे सुद्धा सर्व आयकर अधिका-यांनी निवारण केले.
सूत्रसंचालन किरण मदने (आयकर निरीक्षक) नांदेड यांनी केले. आभार प्रदर्शन आयकर अधिकारी संजय इंगोले यांनी केले. कार्यक्रमाला आयकर अधिकारी संजय रडके, अध्यक्ष आयटीपीए परभणी अरुण ओझा, अध्यक्ष सनदी लेखापाल संघटना परभणी व्यंकटेश पांपटवार, एआयएफटीपीचे सहसचिव राजकुमार भांबरे, आयकर कर्मचारी वृंद यांची प्रमुख उपस्थिती होती.