21.4 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रफोटोत येतो म्हणून मित्राला मारली लाथ

फोटोत येतो म्हणून मित्राला मारली लाथ

रावसाहेब दानवेंचा व्हीडीओ व्हायरल, विरोधक आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी
माजी मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे हे सध्या चर्चेत आले असून त्यांचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओमधील रावसाहेब दानवे यांचे कृत्य पाहून नेटक-यांनी संताप व्यक्त केला आहे. रावसाहेब दानवे हे एका सामान्य कार्यकर्त्याला लाथ मारताना या व्हीडीओमध्ये दिसत आहेत. हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावरून विरोधक दानवेंवर सडकून टीका करताना दिसत आहेत.

मित्राला फोटोपासून दूर ठेवण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी त्यांच्याच मित्राला मिश्किलपणे लाथ मारली. रावसाहेब दानवे यांचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या भेटीदरम्यानचा हा व्हीडीओ आहे. या भेटीदरम्यान रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना बुके दिला.

यावेळी फोटोग्राफर त्यांचा फोटो काढत होता. त्यावेळी रावसाहेब दानवे यांचा कार्यकर्ता आणि मित्र फोटोमध्ये आला. यावेळी त्यांनी लाथ मारून त्यांना बाजूला केले. नेहमी नेहमी फोटो येतो म्हणून दानवे यांनी त्याला दूर सारल्याचे सांगितले जात आहे. शेख हमद असे रावसाहेब दानवे यांच्या मित्राचे नाव आहे. दानवे यांचा हा व्हीडीओ व्हायरल होत असून त्यांच्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे.

रावसाहेब दानवे यांच्या या व्हीडीओवरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या आहेत. सत्ता या लोकांच्या डोक्यात गेली आहे. यांना सत्तेचा माज आला असेल तर जनता यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या कृत्यामुळे नेटकरी देखील संतप्त झाले आहेत. त्यांनी देखील व्हायरल व्हीडीओवर कमेंट्स करत दानवेंच्या कृतीचा निषेध केला आहे.

कार्यकर्ते, विरोधकांनी व्यक्त केला संताप
रावसाहेब दानवे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहत असतात. यामुळे त्यांच्यावर टीकाही होते. मात्र, त्यांनी फोटोत येऊ नये यासाठी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला लाथ मारल्याने त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांत नाराजी आहे. त्यांनी या घटनेबद्दल चीड व्यक्त केली आहे. त्यांनी दानवे यांची तक्रार थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

सोशल मीडियावर दानवे ट्रोल
विरोधकांनी देखील या घटनेवरून दानवे यांना घेरले आहे. भाजप नेत्यांच्या कृतीतूनच पक्षाच्या मानसिकतेचे दर्शन घडते. कार्यकर्त्यांना नि:स्वार्थीपणे काम करण्याचा सल्ला देणारे नेतेच जर त्यांना लाथा मारत असतील तर कार्यकर्ते नाराज होणे साहजिक आहे असे एकाने म्हटले आहे. हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत दानवे यांना झापले आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांसोबत असे वागणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे अनेकांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR