मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावरून मविआ आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. अशातच अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेल्या अजित पवार यांनी महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री कोण होते हे सांगितले आहे. एका मुलाखतीत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी विलासराव देशमुख सर्वांत चांगले मुख्यमंत्री होते, असे म्हटले आहे.
माझ्यावर अनेक मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्याचा प्रसंग आला. आपण गेल्या काही काळापासून युती-आघाडीच्या राजकारणाच्या युगात आहोत. देशात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असण्याची शक्यता नसते. विलासराव देशमुखांनी आघाडी सरकारचे नेतृत्व करण्याची चांगली रणनिती तयार केली होती. यामुळे ते माझ्या मतानुसार सर्वोत्कृष्ट सीएम होते, असे अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहात का? या प्रश्नावर अजित पवारांनी आपण शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. परंतू, निकालानंतर महायुती विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदावर निर्णय होईल असे ते म्हणाले.