लातूर : प्रतिनिधी
तुरीचे पीक फुलोरा अवस्थेत आले आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे व धुक्यामुळे तुरीवर विविध रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठ्या प्रमाणात फवारणीवर खर्च करावा लागत आहे.
यंदाच्या रबी हंगामात लातूर जिल्ह्यात तुरीचा पेरा वाढला आहे. सध्या तुरीला चांगला भावही मिळत आहे. तुरीचे पीकही चांगले बहरले आहे. तुरीचे पीक फुुलोरा अवस्थेत आहे. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण राहिल्याने व पहाटे धुके पडत असल्यामुळे तुरीच्या पिकावर विविध रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतक-यांना महाहगड्या फवारण्या करण्याकडे कल वाढला आहे. सततच्या धुक्यामुळे तुरीची होणारी फुलगळ थांबून चांगली फळधारणा व्हावी, याकरीता शेतकरी फवारणीत व्यस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
यावर्षी सततच्या भीज पावसामुळे बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढले असून सततचे धुके, ढगाळ व दमद वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पान गुंडळणा-या व पाने खाणा-या अळीचा झालेला प्रादुर्भावामुळे कीड व्यवस्थापन गरजेचे झाले असून शेतकरी औषधी फवारणीवर भर देत आहेत. गेल्यावर्षी तुरीत मोठ्या प्रमाणात मरचे प्रमाण होते. मात्र यावर्षी मरही कमी असून सतत पडलेल्या पावसामुळे तुरीचे पीक बहरात आहे. त्यामुळे चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असल्याने शेतकरी कीड व्यवस्थापनात गुंतले आहेत.