नागपूर : आर्थिक टंचाई, खतांचा तुटवडा, नैसर्गिक आपत्ती अशा प्रतिकूल परिस्थितीतही परभणीसह मराठवाड्यातील शेतकरी परभणी येथील कृषी विद्यापीठ पेक्षा ५ ते ६ पट जास्त उत्पादन काढतात. संशोधनावर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करूनही जर विद्यापीठे रोल मॉडेल बनू शकत नसतील तर अशी अपयशी कृषी विद्यापीठे हवीतच कशाला असा प्रश्न पडतो? पांढरा हत्ती म्हणून ओळखल्या जाणा-या कृषी विद्यापीठाची अनुदाने बंद करून विद्यापीठाने स्वत:चे कृषी उत्पादन वाढवून स्वत: सक्षम व्ह्यावे आणि विद्यापीठ चालवावे अशी जबाबदारी त्यांच्यावर का देण्यात येत नाही?. वनामकृवि म्हणजे पांढरा हत्ती पोसणे ठरत असल्याचे सांगत त्यांनी विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे काढले. तसेच महाराष्ट्र कृषी सेवा व संशोधन परिषद पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांनी विद्यापीठाच्या अशा कामगीरीची दखल घेण्याची मागणी आ. राजेश विटेकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हिवाळी अधिवेशनात बोलताना केली आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आ. विटेकर यांनी परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या निष्क्रिय कामकाजाबद्दल औचित्याच्या मुद्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले. आ. विटेकर म्हणाले की, कोट्यवधी रुपयांचा खर्च करुनही शेतक-यांपेक्षा अत्यल्प उत्पादन मिळविणा-या परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या कारभारामुळे जनतेत अनास्था निर्माण झालेली आहे. लोका सांगे ब्रम्हज्ञान अन आपण कोरडे पाषाण अशी विद्यापीठाची स्थिती आहे. उत्कृष्ट प्रतीचे बियाणे, खताची पुरेशी मात्रा, दर्जेदार फवारणी औषधी, पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्याशिवाय शेतक-यांना भरघोस उत्पन्न मिळणार नाही असे सल्ले देणा-या परभणीच्या कृषी विद्यापीठाने काढलेले किरकोळ उत्पादन लक्षात घेता विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार होत आहे का? असा प्रश्न मराठवाड्यातील शेतक-यांना पडला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अत्यंत फुटकळ उत्पादन मिळाल्याचे निदर्शनास आले आहे असे आ. विटेकर म्हणाले.
विद्यापीठाने सोयाबीनचे २ हजार ३०७ हेक्टरवर पेरणी करून ६ हजार ६२८ क्विंटल उत्पन्न मिळवले आहे. म्हणजे केवळ २.८७ प्रती एकर उत्पन्न मिळवले. परभणी जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी सोयाबीनचे सरासरी दहा क्विंटल उत्पन्न काढतात. ४७ एकर क्षेत्रावर मुगाची पेरणी करून फक्त ५४ क्विंटल उत्पन्न काढले म्हणजे प्रती एकर केवळ १ क्विंटल इतके अत्यल्प उत्पन्न मिळवले. जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी ६ ते ७ क्विंटल उत्पन्न काढून दाखवतात. शेतक-यांसाठी योग्य मार्गदर्शन करुन त्यांना उत्पादनवाढीची सुत्रे शिकवणे तसेच नवनवीन संशोधन करणे हा कृषी विद्यापीठाचा उद्देश सोडून दरवर्षी मिळणा-या १०० कोटी रुपयांच्या अनुदानापैकी फक्त २ कोटी रुपये संशोधनासाठी खर्च केले जातात तर सुमारे ३४ कोटी रुपये मजुरांची बनावट हजेरी दाखवून उचलण्यासाठी खर्च केले जातात अशी चर्चा नागरिक करत असल्याने विद्यापीठ पुरते बदनाम झाले आहे असा आरोपही आ. विटेकर यांनी केला. विद्यापीठाचा कारभार आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया असा असून हा प्रकार थांबविण्याची गरज आहे असे सडेतोड सांगत आ. विटेकर यांनी संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.