बीड : जिल्ह्याचे माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या रत्नसुंदर मेमोरियल रुग्णालयाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. प्रकाश सोळंके यांच्या पत्नी अध्यक्ष या रुग्णालयाच्या अध्यक्ष आहेत. माजलगाव शहरातील बायपास रोडवर रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलला २०२१ मध्ये परवाना देण्यात आला होता. १०० बेड्सचे हे रुग्णालय आहे. पण वास्तविक पाहता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रुग्णालय अस्तित्वाच नसल्याची तक्रार सुभाष नाकलगाकर यांनी बीड जिल्हा रुग्णालयाचे शैल्यचिकीत्सक डॉक्टर अशोक बडे यांच्याकडे केली. त्यानंतर या रुग्णालयाची चौकशी करण्यात आली.
या चौकशीमधून रुग्णालय अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला. माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या माध्यामातून शहरातील सर्वे नंबर ३७२ ही जागा वादग्रस्त असूनही त्या ठिकाणी या रुग्णालयाचे बांधकाम करण्यात आले. दरम्यान त्यामुळे या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम देखील वादग्रस्त ठरले होते. या इमारतीला माजलगाव नगरपालिकेचा बांधकाम परवाना हा ६/१/२०२३ चा आहे. तसेच बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार २१ जून २०२१ रोजी १०० बेड्सच्या या रुग्णालयाला परवाना देण्यात आला होता. पण या इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याची बाब यावेळी निदर्शनास आली आहे.