आठवड्यात ०.२ टक्क्यांची घसरण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया शुक्रवारी ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण शुक्रवारीही कायम राहिली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८५.९६५० वर बंद झाला. या आठवड्यासाठी ही ०.२ टक्क्याची घसरण असून या आठवड्यात सलग तिस-या दिवशी रुपया नीचांकी पातळीवर घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी ८५.९३२५ च्या मागील विक्रमी नीचांकी पातळी ओलांडली. दरम्यान, रुपयाची ही घसरण सलग दहावी साप्ताहिक घसरण नोंदवली गेली.
मजबूत होत असलेला डॉलर आणि कमकुवत भांडवली प्रवाह यामुळे चलनाला सातत्याने दबावाचा सामना करावा लागला आहे. डॉलरचा निर्देशांक १०९ च्या वर राहिला आहे. कारण यूएस नॉन-फार्म पेरोल डेटाची प्रतीक्षा आहे. ज्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीची अपेक्षा निर्माण होऊ शकते. रॉयटर्सच्या एका अहवालात नमुद केलेल्या तीन व्यापा-यांच्या माहितीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने काम करणा-या सरकारी बँकांनी शुक्रवारी डॉलरची विक्री करण्यासाठी हस्तक्षेप केला आणि रुपयाचे नुकसान मर्यादित करण्यात मदत केली.