मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा ११ हजार रूपये सन्माननिधी देण्यात येतो. तो वाढवून २० हजार करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
बीड प्रकरणावरून सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार पुरस्कार समारंभात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडिया ट्रायल बद्दल आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकारांना चुका दाखवण्याचे, टीका करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेलच पाहिजे. त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. पण अनेकदा आम्हालाही माहिती नसलेल्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जातात. टीआरपी वाढवण्यासाठी शहानिशा न करता सनसनाटी बातम्या प्रसारित केल्या जातात. चौकशी पूर्ण होण्याआधीच एखाद्याला आरोपीच्या पिंज-यात उभे करून मीडिया ट्रायल केली जाते. हे चुकीचे आहे, अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली. पत्रकारांप्रमाने तुमच्या त्या विश्वसनीय सूत्रांनाही एखादा पुरस्कार देत जा, असा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आजच्या पत्रकरितेबद्दल आपली परखड भूमिका मांडली. प्रसारमाध्यमे अत्यंत वेगवान झाली आहेत. एका क्षणात जगभर बातमी जाते. मागच्या आठवड्यात बारामतीतील कृषी प्रदर्शनात असताना सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्यासंदर्भातली बातमी आली. सकाळी ७ वाजता प्रदर्शन बघत असताना तिथे लगेचच माध्यमांनी सैफ यांच्यावरील हल्ल्याबाबत माझी प्रतिक्रिया विचारली. हल्ला कुठे झाला, कसा झाला याची काहीच कल्पना मला नव्हती.
त्यानंतर विरोधकांनी लगेच मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे आरोप सुरू केले. थोडे धीराने घेत चला, असा उपरोधिक सल्ला अजितदादांनी दिला. अजित पवार कुठे दिसला नाही की लगेच अजित पवार नॉट रिचेबल, अजितदादा कुठे गेले, अशा बातम्या सुरू होतात. आम्हाला आमच्याबाबतच माहिती नसलेल्या बातम्या सुत्रांच्या हवाल्याने देण्यात येतात. मिडिया ट्रायल करण्यात येते. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असेल तरीही मीडिया ट्रायल होते. माझ्यावर तर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्या प्रकरणात मी खूप भोगले आहे. आतापर्यंत त्या आरोपांच्या चौकशा सुरू होत्या. ही नेमकी सूत्रे कोण असतात ते मी पत्रकारांकडून जाणून घेणार आहे. या सूत्रांना देखील एखादा जीवनगौरव पुरस्कार द्यायला हरकत नाही असा टोला अजित पवार यांनी लगावला. हे सगळे प्रकार टीआरपी वाढविण्यासाठी करावे लागतात असे माध्यमांचे म्हणणे असते. पण बातम्या प्रसारित करताना प्रसारमाध्यमांनी सनसनाटी टाळून जबाबदारीने वागावे असा सल्लाही त्यांनी दिला.
आईंना उगाच मनस्ताप झाला
विधानसभेची मतमोजणी २३ तारखेला होती. त्याच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर होते. देवेंद्र फडणवीस आणि मी विविध ठिकाणी होतो. त्यावेळी संध्याकाळी बातम्या बघत असताना विरोधकांचे खातेवाटप सुरू होते. शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेसने हॉटेल, हेलिकॉप्टर बुक केली होती. एखादा आमदार लांबच असेल तर त्याला आणण्यासाठी विमानेही बुक करण्याची तयारी ठेवली होती. सगळेच प्लॅनिंग विरोधकांचे सुरू होते.
दुस-या दिवशी सकाळी मतमोजणी सुरू झाली. सकाळी सकाळीच बातमी चालली की अजित पवार पोस्टल बॅलटमध्ये पिछाडीवर. हे ऐकल्यानंतर माझी आई तणावात आली. तिने बिचारीने देवाचा धावा सुरू केला. मी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेतली त्यांनी तसे काहीच नाही असे सांगितले, नंतर मी चॅनेलला फोन केला. त्यांनी सांगितले की दादा असे म्हणावे लागते. त्यामुळे आमचा टीआरपी वाढतो. असे करणे योग्य नाही. वास्तव आणि सत्य बातम्याच दाखवाव्यात अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.