नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापले आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे आपले प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार प्रवेश साहिब सिंग वर्मा यांच्यावर पैसे, ब्लँकेट आणि बूट वाटल्याचा आरोप करत आहेत. अशातच आता नवी दिल्ली मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांनी प्रवेश वर्मा आणि अरविंद केजरीवाल, या दोघांवरही पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी केला आहे. आप आणि भाजपवर आरोप करताना संदीप दीक्षित म्हणाले की, निवडणुकीत पैसे वाटले जात आहेत, हे पूर्णपणे खरे आहे. याबाबत आपले समर्थकही माहिती देत आहेत, असेही संदीप दीक्षित यांनी सांगितले. तसेच, यावेळी त्यांनी आप नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यावरही निशाणा साधला.
संदीप दीक्षित यांनी सांगितले की पैसे वाटले जात आहेत, हे खरे आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे दिसते की, तो अपयशी ठरत आहे आणि विकासाबद्दल बोलण्यासाठी त्याच्याकडे काहीही नाही, तेव्हा ते पैसे, ब्लँकेट वाटू लागतात. काल मी पूर्व किडवाई नगरमध्ये होतो आणि तिथे लोकांनी मला एक पॅकेट दिले आणि सांगितले की, प्रवेशजी हे वाटप करत आहेत. पुढे संदीप दीक्षित म्हणाले की, निवडणूक आयोगाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, पण कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच, काल आम्ही काली बारी परिसरात प्रचार करत होतो आणि तिथे काही महिला म्हणाल्या की, आप १००० रुपये वाटत आहे आणि त्यासाठी त्या जात होत्या. याचा अर्थ दोन्ही पक्ष त्यात सहभागी आहेत असे संदीप दीक्षित यांनी सांगितले.
भाजप उमेदवार प्रवेश वर्मा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पैसे वाटत आहेत असा दावा आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दावा केला आहे. तसेच, भाजप नेते पैसे, ब्लँकेट आणि बूट वाटतात, पण निवडणूक आयोग गप्प बसले आहे. अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही असे संजय सिंह म्हणाले.