24.8 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयकेसीआरचे विमान जमिनीवर

केसीआरचे विमान जमिनीवर

हैदराबाद : वृृत्तसंस्था
देशव्यापी नेतृत्वाचे स्वप्न तसेच पक्षाचे नाव तेलंगणा व्हाया महाराष्ट्र ते भारत अशी राजकीय वाटचाल सुरू केलेल्या के. चंद्रशेखर राव यांना तेलंगणात मतदारांनी जमिनीवर आणले आहे. तेलंगणात हॅट्ट्रिकच्या तयारीत असलेल्या केसीआर यांना काँग्रेसने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वात तगडा झटका देत सत्ता खेचून आणली. कर्नाटकात विजय मिळवल्यानंतर काँग्रेसने सर्वाधिक लक्ष तेलंगणात केंद्रीत केले होते. मात्र, देशव्यापी नेतृत्वाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या केसीआर यांना याची जाणीव नव्हती. उलट महाराष्ट्रातही त्यांनी आपल्या पक्षाचे जाळे पसरविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचे हे प्रयत्न तेलंगणाच्या जनतेने हाणून पाडले.

केसीआर यांनी तेलंगणानंतर सर्वाधिक लक्ष महाराष्ट्रात केंद्रित केले होते. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडियाला जाहिरातींचा सपाटा लावला होता. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लढण्याची तयारीही सुरू केली होती. त्यासाठी सर्व मतदारसंघात त्यांनी निरीक्षकही नेमण्याची सुरुवात केली होती. त्यामुळे बीआरएस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे गणित बिघडविणार, का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. मात्र, आता त्यांनाच धक्का बसल्याने महाराष्ट्रातील नेत्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मात्र, निवडणुकीअगोदर केसीआरने महाराष्ट्रात दौरे वाढवून महाविकास आघाडीला धक्के देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा हा प्रयत्न औटघटकेचा ठरला. धक्कादायक म्हणजे केसीआरला कामारेड्डी मतदारसंघ असलेल्या बालेकिल्ल्यातच भाजपच्या उमेदवाराकडून पराभवाचा सामना करावा लागला.

महाराष्ट्रातील नेत्यांचे भवितव्य टांगणीला
तेलंगणाच्या सीमेलगतच्या मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करण्यासाठी शेतकरी चळवळीतील नेते रघुनाथदादा पाटील यांना पक्षात घेतले. तत्पूर्वी शंकरअण्णा धोंडगे हेही पक्षात दाखल झाले होते. याशिवाय राजू शेट्टी यांनाही गळ लावण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पंढरपूरचे माजी आमदार नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हेही बीआरएसमध्ये दाखल झाले होते. मात्र, केसीआरच बॅकफूटवर आल्याने या नेत्यांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR