मुंबई : शिवसेनेच्या जडणघडणीत योगदान देणा-या साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक आणि प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निकटचा सहवास लाभलेले पंढरीनाथ सावंत यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सावंत यांच्या निधनाने प्रखर ध्येयवादी आणि तत्वनिष्ठ पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. पंढरीनाथ सावंत हे लालबाग येथील दिग्विजय मिल परिसरातील पत्राचाळ येथे वास्तव्याला होते. वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. आज पहाटे राहत्या घरी झोपेतच त्यांचे निधन झाले. परखड, थेट आणि रोखठोकपणे आपली मते मांडणारा पत्रकार अशी पंढरीनाथ सावंत यांची ओळख होती. सावंत हे मूळचे कोकणातील विन्हेरे गावचे होते. त्यांनी सुरुवातीला गावातील शाळेत शिक्षक म्हणून काम केले.
मुंबई गाठल्यानंतर सुरुवातीला एका कारखान्यात काम केले. त्यानंतर गणेशमूर्ती चित्रकार, काही काळ बस कंडक्टर पुन्हा महापालिकेच्या शाळेत काम असा त्यांचा प्रवास राहिला. सावंत यांचा इस्रायल-अरब युद्धावरचा प्रदीर्घ लेख १९६७ मध्ये मार्मिकमध्ये प्रसिद्ध झाला आणि ते मार्मिकशी जोडले गेले.
बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांचे विश्वासू सहकारी राहिलेल्या सावंत यांनी शोध पत्रकारिता करत अनेक जटिल विषयांवर सखोल माहिती मिळवली आणि लेखांद्वारे प्रसिद्ध केली. इंग्रजीवर प्रभुत्त्व असल्याने आंतरराष्ट्रीय विषयावरही त्यांनी शोध निबंध लिहिले. हिटलरची इत्थंभूत माहिती मिळवून त्याचे चरित्रही प्रकाशित केले. मी पंढरी गिरणगावचा हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे. मार्मिक, श्री, प्रभंजन, ब्लीट्स, लोकमत, पुढारी या साप्ताहिक तसेच वृत्तपत्रात त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. तसेच वयाच्या ८४ व्या वर्षापर्यंत सावंत यांनी मार्मिक चे कार्यकारी संपादकपद त्यांनी भूषवले.
राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सावंत यांचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. याशिवाय मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
प्रगल्भ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक पंढरीनाथ सावंत यांच्या निधनावर शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. सावंत यांना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला होता. त्यामुळे त्यांच्यात रोखठोक भूमिका मांडण्याची धार निर्माण झाली. त्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही नेमकेपणाने प्रकाश टाकला. निर्भिडता आणि व्यासंगाने पत्रकारितेतील नव्या पिढीसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने एक प्रगल्भ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे असे फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे