मुंबई : ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा अवघ्या तीन दिवसांमध्ये थिएटरमध्ये रिलीज होत आहे. विकी कौशलने सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकत आहे. ‘छावा’ थिएटरमध्ये रिलीज होण्याआधीच रेकॉर्डब्रेक कामगिरी करणार अशी शक्यता निर्माण झाली. कारण ‘छावा’च्या अॅडव्हान्स बुकींगला सुरुवात झाली असून केवळ ४८ तासांमध्ये ‘छावा’च्या २ लाख तिकिटांची विक्री झाली.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची ऍडव्हान्स बुकींग रविवारी ९ फेब्रुवारीला सुरु झाली. ऍडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद बघायला मिळाला. अवघ्या ४८ तासांमध्ये ‘छावा’ सिनेमाच्या तब्बल २ लाख तिकिटांची विक्री झालीय. भारतभरातील अनेक थिएटर्स ‘छावा’च्या रिलीजच्या पहिल्याच दिवशी हाउसफुल्ल आहेत. त्यामुळे ऍडव्हान्स बुकिंगमध्येच ‘छावा’ सिनेमाने तब्बल ५ कोटींची कमाई केलीय. हा कमाईचा आकडा बघता जेव्हा सिनेमा रिलीज होईल, तेव्हा तिकिटांची विक्री आणखी जास्त होईल यात शंका नाही.
‘छावा’ मोडणार ‘पुष्पा २’चा रेकॉर्ड?
ऍडव्हान्स बुकींगचे आकडे पाहता ‘छावा’ सिनेमा जेव्हा रिलीज होईल तेव्हा ‘पुष्पा २’च्या कमाईचा रेकॉर्ड सहज मोडेल अशी शक्यता निर्माण झाली. ‘पुष्पा २’ने रिलीज झाल्यावर तब्बल १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यामुळे ‘छावा’ अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता नाकारता येत नाही. १४ फेब्रुवारी २०२५ला ‘छावा’ सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला असून मॅडॉक फिल्मने निर्मिती केली आहे.