26.9 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रमराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार, ग्रामीण लेखक रा. रं. बोराडे यांचे निधन

मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार, ग्रामीण लेखक रा. रं. बोराडे यांचे निधन

लातूर : मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार विशेषत: ग्रामीण लेखक म्हणून ओळख असणारे रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे मंगळवार दि. ११ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्टये समजले जात.

रा. रं. बोराडे यांचा जन्म २५ डिसेंबर, १९४० रोजी लातूर जिल्हा आणि तालुक्यातील काटगाव या गावी झाला होता. त्या काळी काटगाव हे अत्यंत मागासलेले खेडे होते. तेथे शाळाही नव्हती. खासगी शिक्षक ठेवून मुलांना शिक्षण दिले जाई. रा.रं. बोराडे यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण असेच खासगी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली झाले. पाचवीसाठी त्यांना बार्शीला यावे लागले. बार्शीच्या सुलाखे हायस्कूलमध्ये त्यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सोलापूरला गेले. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले.

१९६३ साली रा.रं. बोराडे हे विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७१ पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणले. नंतर ते नामांकित समजल्या जाणा-या औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. ते श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथेही प्राचार्य राहिलेले आहेत. २००० साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.

त्याच वर्षी राज्य सरकारने बोराडे यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सरकारी गोदामात सडत पडलेली पुस्तके ग्रंथालयांना वितरित करवली. खेड्यापाड्यांतील ग्रंथालयांना या योजनेचा फायदा झाला. दुर्लक्षित वाचकांनाही पुस्तके मिळाली. ज्या ठिकाणी ते गेले, तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
नुकताच महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार ‘मराठवाडा साहित्य परिषदे’ला जाहीर करण्यात आला होता. तर मराठी साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला होता. तसेच त्यांना या आधी देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

कोणत्याही साहित्य संमेलनाची निवडणूक लढवायची नाही, असा निश्चय रा. रं. बोराडे यांनी अगदी उमेदवारीच्या काळातच केला होता. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते वंचित राहिले. त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांच्या चाहत्यांनी अनेक वर्षे त्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावला होता. तथापि, त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक प्रदान केले जावे, अशी त्यांची भूमिका होती. आपल्या भूमिकवर ते ठाम होते. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR