गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी पाण्यात
मुंबई : प्रतिनिधी
भारतीय शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरु आहे. एनएसडीएलवरील आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी आज १००० कोटींपेक्षा अधिक किमतीच्या शेअर्सची विक्री केली. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून १० हजार कोटी रुपये काढून घेण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्यूमिनिअमवर २५ टक्के टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केल्याने भारतीय शेअर बाजारात दुस-या दिवशीही घसरण पाहायला मिळाली. दुपारी २.३० वाजेपर्यंत सेन्सेक्स ११०० अंकांनी घसरला होता. त्यानंतर सेन्सेक्स थोड्या प्रमाणात सावरला. यामुळे गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपये पाण्यात गेले.
भारतीय शेअर बाजारातील मोठ्या घसरणीचे आणखी एक कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांकडून करण्यात येत असलेली विक्री हे आहे. डिसेंबर महिन्यात १५ हजार कोटी रुपयांचे समभाग विदेशी गुंतवणूकदारांनी विकले होते. जानेवारी महिन्यात ७८ हजार कोटी रुपयांची विक्री विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी करुन पैसे काढून घेतले होते. आता फेब्रुवारी महिन्यात आजपर्यंत १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढून घेण्यात आली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅल्यूमिनिअमवरील टॅरिफ १० टक्क्यांवरुन वाढवून २५ टक्के करण्याचा निर्णय घेतला. भारतातून अमेरिकेला कमी प्रमाणात स्टीलची निर्यात होते. मात्र, अॅल्यूमिनिअमच्या प्रकरणात स्थिती वेगळी आहे. भारत अॅल्यूमिनिअमचा मोठा उत्पादक देश आहे. अमेरिका सर्वात मोठा खरेदीदार आहे. त्याचा फटका भारताला बसू शकतो.