24.9 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeसोलापूरसकाळच्या सत्रात शाळा भरविण्यासाठी बैठक

सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यासाठी बैठक

सोलापूर : दरवर्षी साधारणत: मार्चच्या पहिल्या-दुस-या आठवड्यापासून उन्हामुळे सकाळच्या सत्रात शाळा भरविली जाते. आताही तसेच नियोजन असून तसा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे पाठविला आहे. ४ किंवा ५ मार्च रोजी शिक्षण समितीची बैठक होईल, त्यात त्यासंबंधीचा निर्णय होईल असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगीतले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात दोन हजार ७७७ शाळा असून त्याअंतर्गत एक लाख ९० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशित आहेत. प्रत्येक शाळांमध्ये झाडे, पिण्याच्या पाण्याची सोय आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची दैनंदिन जबाबदारी त्या शाळेचीच आहे. दरम्यान, शाळांमधील बहुतेक विद्यार्थी त्याच गावातील असतात. शाळा सुटल्यावर बरीच मुले गावात किंवा शाळेच्या मोकळ्या मैदानावर विविध खेळ खेळताना दिसतात.

उन्हाची तीव्रता अजून फार वाढलेली नाही, तरीदेखील फेब्रुवारीमध्येच सकाळच्या सत्रात शाळा भरवावी, अशी मागणी होत आहे. शाळा व्यवस्थापन समित्या, पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार अशावेळी व्हावा, असेही काहींचे मत आहे. सकाळच्या सत्रातील शाळा विद्यार्थ्यांच्या की शिक्षकांच्या सोयीची, असेही काही पालक सवाल करीत आहेत. तरीपण, उन्हाचा तडाखा ध्यानात घेऊन मार्चच्या दुस-या आठवड्यापासून शाळा सकाळच्या सत्रात भरतील असेही अधिका-यांकडून सांगण्यात आले.

गावगाड्यातील बहुतेक पालक कामानिमित्त बाहेरगावी किंवा इतरत्र जातात. मुलाची शाळा सकाळी पावणेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असल्याने त्यांना त्यांची फार चिंता नसते. पण, सकाळच्या सत्रातील शाळांमुळे मुले दुपारीच घरी येतात आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसते. त्यामुळे बहुतेक पालकांकडून सकाळच्या सत्रात शाळा असावी अशी मागणी येत नाही. पण, उन्हामुळे मुलांचे हाल होतात असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR