मुंबई : टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर ६ विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा हा दुबईतील एकदिवसीय क्रिकेटमधील सातवा आणि पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीतील तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये हायव्होल्टेज सामन्याचा थरार रंगणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप २०२५ स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. अवघ्या काही महिन्यांनी पुन्हा एकदा हे दोन्ही संघ भिडणार आहेत. त्यानुसार दोन्ही संघात एक, दोन नाही, तर तब्बल ३ सामने होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा टी २० फॉर्मेटनुसार आशिया कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यातील दुर्सया ते चौथ्या आठवड्या दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत.
येत्या २०२६ वर्षात टी २० वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टी २० फॉर्मेटनुसार आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सहभागी ८ संघांना ४-४ नुसार २ गटात विभागण्यात येणार आहे. तसेच टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात असतील. त्यानंतर दोन्ही संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरले तर सुपर ४ मध्ये उभयसंघात दुसरा सामना होऊ शकतो. तर अंतिम सामन्यात दोन्ही संघ पोहचले तर उभयसंघ एकूण तिस-यांदा आमनेसामने असतील. अशाप्रकारे एकूण ३ वेळा भारत-पाक आमनेसामने येऊ शकतात.