नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात असतानाच विरोधकांचे आरोप खोडून काढणारी आकडेवारी केंद्र सरकारने समोर आणली आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये देशात नोक-यांची संख्या वेगाने वाढल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात देशामध्ये १७.१ कोटी नव्या नोक-यांची निर्मिती झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे २०२४ मध्ये ४.६ कोटी लोकांना रोजगार मिळाला, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली.
केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे देशामधील बेरोजगारीच्या दरात कमालीची घट झाली असून, महिलांना नोक-या मिळण्याच्या प्रमाणात लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मनसूख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार देशामधील बेरोजगारीचा दर २०१७-१८ मधील ६ टक्क्यांवरून घटून २०२३-२४ मध्ये ३.२ एवढा कमी झाला आहे. तर महिलांच्या रोजगाराचे प्रमाण २२ टक्क्यांवरून वाढून ४०.३ टक्के झालं आहे.
कामगारमंत्र्यांनी सांगितले की, सरकारच्या नव्या धोरणामुळे देशातील श्रमशक्ती भक्कम झाली आहे. त्याबरोबरच सामाजिक सुरक्षा योजनांमुळे लोकांचे जीवनमान उंचावले आहे. आयएलओच्या वर्ल्ड सिक्युरिटी रिपोक्ट २०२४-२६ नुसार भारतामध्ये सामाजिक सुरक्षा कव्हरेज दुप्पट झाले आहे. म्हणजेच ते २४.४ टक्क्यांनी वाढून ४८.८ टक्के एवढे झाले आहे. त्याबरोबरच ई-श्रम पोर्टलवर ३०.६७ कोटी असंघटित कामगारांची नोंदणी झाली आहे. कामगारांच्या मदतीसाठी १० नवी ईएसआयसी मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आले आहेत. तसेच १० नवीन कॉलेज बांधण्याची योजना आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.