36.1 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeराष्ट्रीयमाजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात पत्नी,मुलीची चौकशी

माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात पत्नी,मुलीची चौकशी

बंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. २० एप्रिल रोजी ते बंगळुरू येथील त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले होते. दुपारी त्यांचे पत्नीशी भांडण झाले होते. भांडण सुरू असताना, त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर मिरची पावडर फेकली, यावेळी त्यांना बांधले आणि नंतर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

हत्येनंतर ओम प्रकाश यांच्या पत्नीने दुस-या पोलिस अधिका-याच्या पत्नीला फोन करून याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ओम प्रकाश यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आई आणि मुलीची सुमारे १२ तास चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे माजी पोलिस प्रमुख ओम प्रकाश यांच्या हत्येत त्यांची पत्नी मुख्य आरोपी आहे. ओम प्रकाश यांच्या पोटावर आणि छातीवर चाकूने अनेक जखमा आढळून आल्या. ओम प्रकाश आणि त्यांच्या पत्नीमध्ये मालमत्तेवरून वाद होता. ओम प्रकाश यांनी ती मालमत्ता त्यांच्या एका नातेवाईकाला दिली होती, त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. हा वाद एवढा वाढला की हिंसाचार उफाळून आला आणि त्यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या केल्याचा संशय होता. या घटनेत त्यांच्या मुलीचाही सहभाग होता का, याचाही पोलीस आता तपास करत आहेत. ओम प्रकाश यांच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

बंगळुरूच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त विकास कुमार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, पोलिसांना पहाटे ४ वाजता एका निवृत्त अधिका-याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. ओम प्रकाश हे १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मार्च २०१५ मध्ये त्यांची कर्नाटकचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली. यापूर्वी त्यांनी अग्निशमन, आपत्कालीन सेवा आणि गृहरक्षक विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR