15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयपहिलीच्या विद्यार्थ्याने केला तिसरीच्या वर्गातील मुलावर गोळीबार

पहिलीच्या विद्यार्थ्याने केला तिसरीच्या वर्गातील मुलावर गोळीबार

पाटणा : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंजमध्ये आज एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लालपट्टी येथील एका खासगी शाळेतील प्रथम वर्गातील ५ वर्षीय विद्यार्थ्याने तिसरीत शिकणा-या १० वर्षीय विद्यार्थ्यावर गोळी झाडली. ही गोळी विद्यार्थ्याच्या डाव्या हाताला लागली. जखमी मुलाला तात्काळ उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ शाळेत धाव घेतली आणि तपास सुरू केला. विद्यार्थ्याकडे हे हत्यार कसे आले, याचा शोध पोलिस घेत आहेत. स्थानिक लोकांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्याचे वडील पूर्वी या शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. मुलगा शाळेच्या बॅगमध्ये पिस्तूल घेऊन आला होता.

शाळेच्या प्रार्थनेपूर्वी आज सकाळी ही घटना घडली. जखमी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या मुलाला गोळी लागल्याची माहिती दिली. आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांना याची माहिती मिळताच त्यांनी तडकाफडकी शाळा गाठून मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवलेले पिस्तूल आणि त्यांचा मुलगा घेऊन शाळेच्या भिंतीवरून उडी मारून पळ काढला. यावेळी वडिलांनी त्यांची दुचाकी शाळेतच सोडली.

आरोपीच्या पालकांची चौकशी करावी-पीडित मुलांच्या कुटुंबाची मागणी
भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जखमी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. लहान मूल असे कृत्य करेल यावर त्यांचा विश्वास बसत नाही. आरोपी मुलाच्या पालकांचीही चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR