नवी दिल्ली : वृत्तसंस्था
तब्बल १० वर्षानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी ३ टप्प्यांत मतदान झाले. राज्यातील ९० जागांसाठी झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष ८ ऑक्टोबर रोजी लागणा-या निकालावर आहे. त्याआधी आज एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले असून, या अंदाजानुसार राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेसाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे. हरियाणातही कॉंग्रेसला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसला मोठे मताधिक्य मिळेल, असे वाटत नाही. परंतु सत्ता स्थापन्याची संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे.
पिपल्स प्लसच्या एक्झिट पोलनुसार काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्सला सर्वाधिक ३३ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला २३ ते २७ जागा मिळू शकतात. काँग्रेसला १३ ते १५ तर पीडीपीला ७ ते ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. न्यूज १८ च्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात चुरशीची लढत असणार आहे. त्यानुसार भाजपला २८ ते ३०, नॅशनल कॉन्फरन्सला २८-३०, काँग्रेस ३ ते ६, पीडीपी ४ ते ७ जागा मिळू शकतात. आज तक, सी व्होटर्सच्या अंदाजानुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला ४० ते ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला २७ ते ३२ जागा मिळू शकतात. पीडीपीला फक्त ६ ते १२ जागा मिळण्याच अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यात काश्मीर खो-यातील ४७ पैकी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला २९ ते ३३, भाजपला ०-१, पीडीपीला ६ ते १० आणि अन्यला ६ ते १० जागा मिळू शकणार आहेत. जम्मू विभागात भाजपचे पारडे जड असण्याची शक्यता आहे. जम्मू् विभागात एनसी आणि काँग्रेस आघाडीला ११ ते १५ तर भाजपला २७ ते ३१ जागा मिळू शकतात.
हरियाणात कॉंग्रेसला बहुमत
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेस पक्षात चुरशीची लढत झाली. आता ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी आज एक्झिट पोलचा अंदाज समोर आला असून, यात कॉंग्रेसच बाजी मारेल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, कॉंग्रेसलाही काठावर बहुमत मिळू शकते, हरियाणात बहुमतासाठी ४६ आकडा गाठणे गरजेचे आहे. कॉंग्रेस पक्षाला ४४ ते ५४ जागा मिळू शकतात, असे सांगण्यात आले. भाजपला १९ ते २९ जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे. ध्रुव रिसर्चच्या मते कॉंग्रेसला बहुमत मिळणार आहे. कॉंग्रेस पक्षाला राज्यात ५० ते ६४ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे.
एक्झिट पोलचा अंदाज
हरियाणा
एकूण जागा : ९०
भाजप : १५-२९
कॉंग्रेस : ४४ ते ५४
आयएनएलडी : १-५
इतर : ६-९
जम्मू-काश्मीर
एकूण जागा : ९०
भाजप : २०-२५
एनसी-कॉंग्रेस : ३५-४०
पीडीपी : ४-७
इतर : १२-१६