नंदुरबार : प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध भागात गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसामुळे मिरची तोडणीला ब्रेक लागला आहे. परिणामी, नंदुरबार बाजारातील आवक निम्म्यावर आली आहे. हंगाम सुरू होऊन दीड महिना होऊनही बाजारात अद्याप केवळ चार हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. शुक्रवारी त्यात ५०० क्विंटलची भर पडली होती.
नंदुरबार, शहादा आणि तळोदा तालुक्यांसह नवापूर तालुक्यातील विविध भागात मिरची लागवड करण्यात आली आहे. साधारण ६ हजार हेक्टरवर यंदा मिरची लागवड करण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर प्रारंभीपासून मिरचीची तोड सुरू झाली होती. यंदा पाऊस चांगला असल्याने मिरचीचे उत्पादन अधिक येण्याचे आडाखे बांधले जात होते. या अंदाजांना खरे ठरवत मुबलक मिरची उत्पादन आले होते. यातून नंदुरबार बाजारपेठेत आवक सुरू झाली होती.
सुरुवातीला वाढलेली आवक पावसामुळे कमी होऊन बाजारपेठ ठप्प झाली होती. १९ ऑक्टोबरच्या पावसानंतर ओलावा कायम असल्याने ही आवक अत्यंत कमी झाली आहे. गत दीड महिन्यापासून सुरू असलेल्या खरेदी हंगामात आतापर्यंत ४ हजार क्विंटल मिरची आवक झाली आहे. यात लाली, गौरी, शार्कवन या वाणांची सर्वाधिक आवक आहे. या वाणाला शुक्रवारी २ हजार ३११ ते ५ हजार ५८७ रुपयांचा प्रतिक्विंटल दर देण्यात आला.
हिरव्या मिरचीला वाढीव भाव
सध्या बाजारात हिरव्या मिरचीचा तुटवडा आहे. यामुळे हिरवी मिरची ६० रुपये प्रतिकिलो दरात व्यापारी खरेदी करत आहेत. हे दर अधिक असल्याने शेतकरी झाडावर मिरची लाल होण्यापूर्वीच तिचा तोडा करून घेत आहेत. परिणामी लाल मिरचीची आवक कमी झाली आहे.