बंगळूरू : कर्नाटकातील बहुचर्चित म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमयूडीए) मधील घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) त्यांच्याविरुद्ध पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटक लोकायुक्तांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांविरुद्ध फसवणूक आणि इतर कलमांखाली एफआयआर दाखल केला होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी याचिकाकर्ते स्रेहमोयी कृष्णा यांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. आपल्या निर्णयात न्यायालयाने कर्नाटक लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर म्हैसूर लोकायुक्त पोलिसांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.
दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आरोपी क्रमांक एक, तर त्यांची पत्नी पार्वती यांना आरोपी क्रमांक दोन बनविण्यात आले आले आहे. तर मुख्यमंत्र्यांचे मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी यांना आरोपी क्रमांक तीन आणि देवराज यांना आरोपी क्रमांक चार बनविण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने म्हैसूरमधील म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीची जागा वाटप केल्याचा आरोप आहे.