डेहराडून : सिल्कियराच्या बांधकामाधीन बोगद्यातून कामगारांना बाहेर पडण्यासाठी अजून काही कालावधी शिल्लक आहे, पण त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याची तयारीही जोरात सुरू आहे. आता बोगद्यात अडकलेल्या कामगारांना एअरलिफ्ट करण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे. कामगारांना बोगद्यातून सुखरूप बाहेर काढताच त्यांना रुग्णवाहिकेतून थेट चिन्यालीसौर येथील आरोग्य केंद्रात आणले जाणार आहे. त्यांच्यावर येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जाणार आहेत.
तसेच काही गरज भासल्यास त्यांना येथून चिनूक हेलिकॉप्टरद्वारेही नेण्यात येणार आहे. चिनूक हेलिकॉप्टर अतिशय वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे, त्यामुळेच अत्यंत दाट टेकड्यांमध्येही ते यशस्वीपणे काम करू शकते. तसेच कोणत्याही प्रकारच्या हवामानात हे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकते. चिनूक हेलिकॉप्टर ११ टनांपर्यंतचा भार उचलू शकतो. हे हेलिकॉप्टर १९ देशांचे सैन्य वापरतात.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी पत्रकार परिषदेत बचाव कार्याशी संबंधित महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. ताज्या परिस्थितीचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, आम्ही अद्याप यशापर्यंत पोहोचलो नसून त्याच्या जवळ आहोत. ते म्हणाले की, मॅन्युअल काम अजूनही सुरू आहे. काल (सोमवारी) रात्रभरही काम सुरूच होते. आम्ही आता ५८ मीटरवर पोहोचलो आहोत. आम्हाला कोणतीही घाई करायची नाही. कामगारांची तसेच बचाव कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमचे प्राधान्य आहे.
चार जवानांची तीन स्वतंत्र टीम
जेव्हा कामगारांना बाहेर काढण्याची वेळ येईल तेव्हा एनडीआरएफ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. एनडीआरएफच्या चार जवानांची तीन स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. ती आत जाऊन सर्व गोष्टींची व्यवस्था करेल. एसडीआरएफ त्यांना सपोर्ट करेल.
बाहेर येण्यासाठी पाच मिनिटे लागणार
पॅरामेडिक्सची टीम आत असून ती वैद्यकीय योजना राबवणार आहे. प्रत्येक कामगारांना बाहेर येण्यासाठी अंदाजे तीन ते पाच मिनिटे लागणार आहेत. तसेच संपूर्ण बचाव कार्याला तीन ते चार तास लागतील.