वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापी सर्व्हेचा अहवाल जमा करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय)कोर्टाकडे १५ दिवसांची मुदत मागितली आहे. पुरातत्त्व विभागाच्या मागणीवर जिल्हा कोर्टात सुनावणी झाली.
कोर्टाचे न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी पुरातत्त्व विभागाचा अर्ज पाहिला आणि विभागाच्या अधिर्कायांचे म्हणणे ऐकून घेतले. सर्व्हेचा अहवाल तयार होत असून काही तांत्रिक कारणांमुळे हा अहवाल पूर्ण करण्यासाठी आणखी १५ दिवसांच्या कालावधीची गरज आहे असा युक्तिवाद पुरातत्त्व विभागाच्या वकिलांनी केला. मुदत वाढीवर शनिवारी सुनावणी घेतली जाईल, असे न्यायाधीश विश्वेश यांनी सांगितले.
हैदराबादमील लॅबमधून जीपीआरचा (ग्राऊंड पॅनिट्रेटिंग रडार) छापील अहवाल अद्याप मिळालेला नाही. हा अहवाल तयार केला जात असून त्याला आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे १५ दिवसांची मुदत मिळण्याची गरज असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले. खरे ते कोर्टाने ज्ञानवापीचा सर्व्हेचा अहवाल सिलबंद लिफाफ्यात गुरुवारी सोपवण्याचा आदेश कोर्टाने यापूर्वी दिला होता. केंद्र सरकारच्या विशेष गव्हर्निंग कौन्सिलचे अमित श्रीवास्तव यांनी सांगितले की, सर्व्हे अहवाल तयार झाला नसल्यानेच कोर्टाकडे मुदतवाढ मागितली आहे.
परिसराची १०० दिवसांपेक्षा अधिक पाहणी
पुरातत्त्व विभागाने १०० पेक्षा अधिक दिवस ज्ञानवापी परिसराचा सर्व्हे केला आहे. यादरम्यान खंडित मूर्ती, चिन्हांसह २५० अवशेष मिळाले होते. या अवशेषांना जिल्हाधिर्कायांच्या देखरेखीखाली लॉकरमध्ये ठेवण्यात आले आहेत. हे सर्व अवशेष अद्याप कोर्टासमोर ठेवण्यात आलेले नाहीत.