मुंबई : प्रतिनिधी
देशात झालेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर अनेक सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आले. अशा स्पर्धा परीक्षांमध्ये होणा-या पेपरफुटीमुळे तरुणांचे भविष्य धोक्यात येते, यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊले उचलावीत यासाठी अनेक आंदोलने झाली. यानंतर, आता राज्यातील एमएच-सीईटी परीक्षेच्या निकालावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी एमएच-सीईटी निकालात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनी सर्वप्रथम एमएच-सीईटीमध्ये कथित घोटाळ्याचा आरोप केला. बारावीत ३५ ते ४० टक्के गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना एमएच-सीईटी मध्ये ९० ते १०० पर्सेंटाईल कसे मिळाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सचिन सावंत यांनी निकालाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर, आमदार रोहित पवारांनीदेखील याच मुद्यावरून सरकारवर निशाणा साधला.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, देशभरात नीट पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर जर तरुण पिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूक आहे. नीट पेपरफुटीची चौकशी सुरू असली तरी अशा प्रकारच्या चौकशीतून पुढे काहीही निष्पन्न होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. तसेच नीट सारखाच गडबड घोटाळा ‘एमएच-सीईटी’ परीक्षेतही झाला आहे. दहावी बारावीला जेमतेम ३५-४० टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांना ‘एमएच-सीईटी’परीक्षेत १०० पर्सेंटाईल पडलेले आहेत, हा घोटाळा असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महादेव बालगुडे यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर एका शिक्षकाचा व्हीडीओ शेअर केला. या सुमारे ३० मिनिटांच्या व्हीडीओमध्ये एमएच-सीईटीच्या निकालात कथित गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘‘हे स्वत: शिक्षक आहेत. एमएच-सीईटी घोटाळा कसा झाला, यावरील त्यांचा संपूर्ण व्हीडीओ पाहा. पत्रकार आणि शिक्षकांसारखे अराजकीय लोक पुराव्यांसह बोलतात, तेव्हा जनतेचा विश्वास बसतो. हा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता.’’ असे म्हणत त्यांनी टीका केली.
















