दोहा : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम कराराबाबत कतारकडून सकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत आहेत. अमेरिकेनेही याबाबतचे संकेत दिले आहेत. यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यात लवकरच शांतता करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कतारमध्ये राहणाऱ्या हमासच्या नेत्याचे वक्तव्यही समोर आले आहे. निवेदन देण्यापूर्वी त्यांनी कतारची राजधानी दोहा येथे इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसच्या (आयसीआरसी) अध्यक्षांची भेट घेतली. गेल्या महिन्यात सुटका करण्यात आलेल्या चार ओलिसांच्या सुटकेमध्ये आयसीआरसीची महत्वाची भूमिका होती.
हमासच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आता या करारावर चर्चा केली जात आहे.
चर्चेत समाविष्ट असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करताना ते म्हणाले की, इस्रायली महिला, मुलांची सुटका आणि इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची सुटका यावर चर्चा होईल. जर करार झाला तर अधिक मदत पुरवठा गाझापर्यंत पोहोचू शकेल. असे मानले जात आहे की, जर करार झाला तर इस्राईल आणि हमासमधील संघर्ष थांबेल आणि ओलीसांची सुटका होईल. तसेच मदत पुरवठा गाझापर्यंत पोहोचू शकेल. यावर इस्रायलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हमासचे नेते इस्माईल हानिया यांनी म्हटले आहे की, त्यांचा गट इस्रायलसोबत युद्धविराम कराराच्या जवळ आहे. कतार दोन्ही देशांदरम्यान मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. हानिया कतारमध्ये राहतात. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसचे अध्यक्ष सध्या कतार दौऱ्यावर आहेत. यासंदर्भातही करार होण्याची शक्यता आहे. हमासने केलेल्या दाव्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ओलिसांच्या सुटकेबाबतचा करार पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत दिले आहेत.