35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरजालन्यात मतदानापूर्वीच आढळला मतदान कार्डांचा ढीग

जालन्यात मतदानापूर्वीच आढळला मतदान कार्डांचा ढीग

जालना : चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच जालन्यात बेवारस मतदान पत्रे चक्क कच-याच्या ढिगा-यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, अद्याप येथील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालेले नाही. शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओ शेजारी तब्बल १७६ मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली. याबाबत माहिती मिळताच निवडणूक अधिकारी व महसूल कर्मचा-यांनी घटनास्थळावरुन धाव घेऊन ही ओळखपत्रे ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे.

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कदीम पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नूतन वसाहत भागातील रहिवासी शुभम नारळे यांना गुरुवारी सकाळी परिसरात मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत आढळून आले. याबाबत, त्यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधत जिल्हा निवडणूक विभाग व कदीम पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दुपारी महसूल कर्मचा-यांनी मतदान ओळखपत्रांचा पंचनामा केला.
कच-याच्या ढिगा-याजवळ ही मतदार ओळखपत्रे अज्ञात व्यक्तीने टाकलेली होती. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय अधिका-यांनी त्याचा पुढील तपास सुरू केला आहे. सापडलेल्या ओळखपत्रांची नावे बीएलओमार्फत तपासणीचे काम सुरू करण्यात आले असल्याचे माहितीही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. मात्र, मतदानापूर्वीच येथे अशाप्रकारे मतदान ओळखपत्रे आढळून आल्याने परिसरात बोगस मतदानाची चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्यातील पहिल्य तीन टप्प्यात मतदान उत्साहात पार पडले. राजकीय नेत्यांच्या सभा, उन्हासह प्रचाराचा धुमधडाका आणि गाठीभेटींसाठी उमेदवारांची होणारी लगगब सर्वत्र दिसून आली. तिस-या टप्प्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात मतदान पार पडले. यावेळी, सांगोल्यातील मतदान केंद्रावर चक्क ईव्हीएम मिशन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. काही ठिकाणी बोगस मतदानाचाही प्रकार झाल्याचा आरोप होत आहे.

दानवे विरुद्ध काळे लढत रंगात
जालना लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होत आहेत. येथील लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून रावसाहेब दानवे तर महाविकास आघाडीकडून कल्याणराव काळे यांच्यात थेट लढत होत आहे. तर, मराठा आरक्षणाचा मुद्दा याच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून राज्यभर पुन्हा पेटला होता. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट येथील मतदारसंघात होऊ शकतो, असे चित्र दिसून येते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR