20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये महिला सरपंचाला मागितली एक लाखाची खंडणी

बीडमध्ये महिला सरपंचाला मागितली एक लाखाची खंडणी

उपसरपंचासह दोन सदस्यांवर गुन्हा

अंबाजोगाई : केज तालुक्यातील मस्साजोग येथील खंडणी प्रकरण ताजे असतानाच अंबाजोगाई तालुक्यातही एका महिला सरपंचालाच खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाला गावातीलच उपसरपंच व अन्य दोन ग्रामपंचायत सदस्यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ममदापूर पाटोदा येथील महिला सरपंच मंगल राम मामडगे यांना तिघाजणांनी एक लाख रुपये खंडणी मागितल्याची फिर्याद दिल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ममदापूर पाटोदा या गावात विकास कामाकरिता निधी आल्यानंतर वेळोवेळी हेच लोक अडथळे आणतात. त्याचबरोबर शासकीय कार्यालयात जाऊन खोट्या तक्रारी देतात. आपल्यावर मानसिक दहशत टाकतात. असे प्रकार वारंवार होत होते. १६ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा ममदापूर येथील दुरुस्तीची कामे सुरू होती.

ते पाहण्याकरिता जात असताना वसंत सोपान शिंदे, अनिल लालासाहेब देशमुख व ज्ञानोबा श्रीमंतराव देशमुख हे शाळेजवळ आले. एकमेकांना बोलत असताना गावातील साक्षीदार दोन व्यक्ती समोर त्यांनी सरपंचांना शाळा दुरुस्तीच्या कामासाठी आलेल्या चार लाख रुपयांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी केली. एक लाख रुपये नाही दिले तर तुम्हाला गावातील कोणतेच काम करू देणार नाही. तसेच तुमच्याविरोधात अर्ज देऊन आधीच्या माजी महिला सरपंचांनी आम्हाला पैसे न दिल्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले तशीच तुमची अवस्था करून टाकू अशी धमकी दिली.

याबाबत त्याच वेळी या लोकांविरुद्ध ऑनलाइन तक्रार केली होती. त्यामुळे १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात येऊन आपण तक्रार नोंदवत असल्याचे या महिला सरपंचांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR