35.3 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeमहाराष्ट्रजळगावमध्ये चक्क पोलिसाचेच अपहरण

जळगावमध्ये चक्क पोलिसाचेच अपहरण

४ तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ

जळगाव : ज्यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी असते, ज्यांमुळे नागरिक बिनधास्त जीवन जगतात, त्याच पोलिसांच्या सुरेक्षाचा प्रश्न उपस्थित झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात एका पोलीस कर्मचा-याचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर पोलीस विभाग अलर्ट मोडवर असून या कर्मचा-याच्या सुटकेसाठी जळगाव तसेच मध्य प्रदेशातील पोलिस कर्मचारी रवाना करण्यात आले होते. अखेर, ४ तासांच्या थरारानंतर पोलिस कर्मचा-याला सुखरुप परत आणण्यास पोलिसांना यश आले आहे. मात्र, या घटनेने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांचेच अपहरण होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर दोन उमर्टी गाव असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे. चोपडा ग्रामीण पोलीस महाराष्ट्रातील उमर्टी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले असता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काहीजण पोलिसांवर धावून गेले. त्यानंतर, एका पोलिस कर्मचा-याला ताब्यात घेऊन त्यांनी सीमेपलीकडे असलेल्या मध्य प्रदेशातील उमर्टी गावात नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्यासह पोलिस अधिका-यांचा ताफा उमर्टी गावाकडे रवाना झाला. तसेच, घटनेसंदर्भात मध्य प्रदेश पोलिस व प्रशासनाशी संपर्क सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून गतीमान तपास सुरू होता.

४ तासांच्या थरारानंतर पोलिसाची सुटका
चार तासांच्या थरारानंतर अपह्रत पोलिस कर्मचा-याची सुटका करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. एका गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचा-यास आरोपींच्या नातेवाईकांनी अपहरण करून नेल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मधप्रदेश सीमेवर असलेल्या उमर्टी गावात घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटने नंतर जळगावसह मध्यप्रदेशातील पोलिसांनी या पोलिस कर्मचा-याच्या सुटकेसाठी पोलिसांची मोठी कुमक रवाना केली होती. पोलिसांची मोठी कारवाई होण्याच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी अपह्रत पोलिस कर्मचा-यास पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR