बीजिंग : उत्तर चीनमधील शांक्सी प्रांतात एका व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागल्याचे वृत्त चीनच्या सरकारी माध्यमांनी दिले आहे. या घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण झाखामी झाले आहेत. चीनमधील लुलियांग शहरातील चार मजली इमारतीत गुरुवारी भीषण आग लागली. त्यानंतर या इमारतीतून अनेक लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यापैकी ५१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात आली असली तरी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
शांक्सी प्रांत हा कोळसा उत्पादनाच्या बाबतीत चीनमधील सर्वात मोठा प्रांत आहे. सुरक्षा उपायांच्या ढिसाळ कारभारामुळे चीनमध्ये औद्योगिक अपघात सामान्य आहेत. एप्रिलमध्ये बीजिंगमधील हॉस्पिटलला लागलेल्या आगीत २९ जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी जूनमध्ये रेस्टॉरंटमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात ३१ जणांचा मृत्यू झाला होता.