नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणाकरता गेल्या सहा दिवसांपासून परत एकदा मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे आणि त्यांच्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना चांगले आरोग्य मिळावे, आंदोलनासाठी ताकद मिळावी, म्हणून आज नाशिक शहरातील सर्वधर्मीय समाजबांधवांच्या माध्यमातून बडी दर्गा येथे चादर चढवून दुआ पठण करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलने करण्यात येत असून मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर आणि आता पुण्यातही आंदोलनाचे लोण पसरले आहे. नाशिक जिल्ह्यातही आंदोलन सुरू असून ठिकठिकाणी रास्ता रोको, निषेध मोर्चे, कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील बहुतांश मुस्लिम समुदायाकडून देखील मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यात आला आहे.. त्याचबरोबर अनेक पक्षांकडून देखील पाठिंबा दर्शवला जात आहे. नाशिक शहर काँग्रेसने देखील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नाशिक शहरातील बडी दर्गा येथे जात दुवा पठण करण्यात आली. त्याचबरोबर दर्ग्यावर चादरही चढविण्यात आली.