24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रमाऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून

माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून

आळंदी : वारकरी हाच केंद्रबिंदू म्हणून माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने पायी चालली आहे. मात्र यंदाची आषाढी पायीवारी कोणत्या न कोणत्या कारणाने वादाच्या भोव-यात सापडत आहे.

माऊलींची पालखी पुणे मुक्कामी असताना प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी वारकरी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावर विश्वस्तांकडून दिलगिरी व स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र हा प्रकार होऊन दहा दिवस होत आहेत तोच माऊली सोहळ्यातील चोपदाराने रागाच्या भरात एका वारकरी महिलेला जोरात ढकलून दिले. अक्षरश: ही महिला वारकरी डोक्यावर असलेली तुळस घेऊन जमिनीवर खाली पडली. या प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून अनेक वारक-यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

माऊलींचा पालखी सोहळा पंढरीच्या वाटेवर आहे. गुरुवारी (दि. ३) ठाकूर बुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरा गोल रिंगण सोहळा पार पडला. त्या दरम्यान एक महिला वारकरी डोक्यावर तुळस घेऊन त्या रिंगणातून चालली होती. मात्र रिंगणातून ती बाहेर होत असताना माऊली सोहळ्यातील चोपदाराने रागात सांगितलेले ऐकायला येत नाही का? असे म्हणत त्या महिलेकडे धावत येऊन पाठीमागून जोराने ढकलून दिले. त्यावर त्या वारकरी महिलेने काय झाले एवढे ? असे विचारले तरीसुद्धा बाळासाहेब चोपदारांनी मोठ्या आवाजात संबंधित महिलेस दम भरला. विशेषत: हा सर्व प्रकार सुरू असताना देवस्थानचे ट्रस्टींनी बघ्याची भूमिका घेतली.

अखेर देवस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी चोपदारांना आवर घालत तिथून बाजू केले. या प्रकरणावर अजून विश्वस्तांन प्रतिक्रिया दिली नाही. तसेच चोपदार यांनी सुद्धा त्याबाबत खुलासा केला नाही. दरम्यान तीन-चार वर्षांपूर्वी दोन चोपदार वादाच्या भोव-यात अडकले होते. त्यावेळी देवस्थानने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर पुढील काळात ते पुन्हा सेवेत रुजू झाले. मात्र या घडलेल्या संतापजनक घटनेनंतर संबंधित बाळासाहेब चोपदारांवर देवस्थान काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरेल. वारीतील चोपदारांची संख्या जिल्हा सत्र न्यायाधीशांनी ठरवल्याप्रमाणे असावी. वारीत २ चोपदार असावे. तसेच दोघांनाच देवस्थानने तशी सेवा द्यावी अशी मागणी अनिकेत कु-हाडे यांनी देवस्थानकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR