नवी दिल्ली : आप आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. आप दिल्लीमध्ये चार जागा लढवेल, तर काँग्रेस तीन जागा लढवेल. गुजरातमध्ये काँग्रेस २४ जागा लढवेल, तर आप दोन जागावर उमेदवार देईल. हरियाणात काँग्रेस ९ तर आप एका जागावर निवडणूक लढवेल. काँग्रेस गोवामध्ये दोन्ही जागा लढणार आहे. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी याची माहिती दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये चर्चेच्या फेरी सुरु होत्या. त्यानंतर आज जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर एकमत झाले. दिल्लीमध्ये आप नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीमधून उमेदवार देईल. तर काँग्रेस चांदणी चौक, उत्तर पूर्व आणि उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उतरवेल.
गुजरातमध्ये काँग्रेस २४ जागा लढेल, तर आपसाठी भरुच आणि भावनगर या जागा सोडण्यात आल्या आहेत. हरियाणामध्ये आप कुरुक्षेत्र या जागेवर एक उमेदवार देईल. नऊ जागा काँग्रेससाठी आहेत. चंदीगडमध्ये काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. गोव्याच्या दोन्ही जागा काँग्रेस लढवेल. त्यामुळे इथे आपला संधी मिळालेली नाही. दुसरीकडे, पंजाबमध्ये सर्व १४ जागांवर आप लढणार आहे.
भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठी विरोक्षी पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. जागा वाटपावरुन अनेकदा चर्चा फिस्कटण्याची वेळ आली. पण, अखेर आप आणि काँग्रेसने जुळवून घेतले. त्यामुळे भाजपसमोर इंडिया आघाडी आव्हान उभे करणार असे दिसते.
महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा देखील लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. दोन-तीन दिवसात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये देखील ममता बॅनर्जी यांच्यासोबत पुन्हा चर्चा सुरु करण्यात आलीे. ममता बॅनर्जी सोबत आल्यास इंडिया आघाडीला आणखी बळ मिळणार आहे.