नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्याच्या आरोपांमुळे आम आदमी पक्ष सध्या गेल्या दहावर्षांतील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. एकीकडे मनिष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्यासारखे दिग्गज नेते कारागृहात आहेत. तर दुसरीकडे ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण आपची धुरा आहे, अशा खुद्द अरविंद केजरीवाल यांच्यावरही तलवार लटकलेली आहे. मात्र आता, आम आदमी पक्षाने आलेल्या संकटाचे रुपांतर शक्तीत करण्यासाठी काम सुरू केले आहे. यावेळी भाजपला त्यांच्याच अंदाजात उत्तर देण्यासाठी अरंिवद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयाचा फॉर्म्युला वापरला आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, अरविंद केजरीवाल, संबंधित नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हणत, केंद्रीय तपास यंत्रणेला सामोरे गेले नाही. ही नोटीस मिळाल्यापासूनच आप आणि केजरीवाल स्वत: देखील सिसोदिया आणि संजय सिंह यांच्याप्रमाणेच आपल्यालाही अटक होऊ शकते, अशी भीती व्यक्त करत आहेत. ही भीती लक्षात घेऊनच आपने पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामुळे, केजरीवाल यांना तुरुंगात पाठवल्यास, त्यांनी राजीनामा द्यावा की तिहारमधूनच सरकार चालवावे, यासंदर्भात पक्षात विचार सुरू आहे.