नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतीय न्याय संहितामध्ये (भारतीय न्याय संहिता २०२३) हिट अँड रन प्रकरणात कठोर नियम केले आहेत. या कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि बस चालक रस्त्यावर उतरले असून दिल्ली, यूपी, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थानसह सर्व राज्यातील चालक संपावर आहेत. दरम्यान, भारताचा समावेश अशा देशांमध्ये होतो जिथे ‘हिट अँड रन’ची प्रकरणे सर्वाधिक घडतात आणि यामुळे मृत्यूही सर्वाधिक होतात. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे साडेचार लाख रस्ते अपघात होतात, त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. तसेच हिट अँड रन प्रकरणांमध्ये २५ ते ३० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो.
‘हिट अँड रन’ हा रस्ता अपघाताचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये वाहन दुसर्या वाहनाला, व्यक्तीला किंवा वस्तूला धडकल्यानंतर, पकडले जाण्याच्या भीतीने चालक न थांबता किंवा मदत करण्याचा प्रयत्न न करता घटनास्थळावरून पळून जातो. अपघातानंतर चालक जखमी व्यक्तीला मदत न करता अपघातस्थळावरून पळून जाणे, ही गुन्हेगारी बाब आहे. हिट अँड रन प्रकरणे अमेरिका आणि जपानसारख्या विकसित देशांमध्येही घडतात. रस्ता अपघातानंतर कोणत्याही परिस्थितीत अपघातस्थळ सोडून जाणे हा गुन्हा आहे. इथे वेगवेगळ्या राज्यांचे कायदे वेगळे आहेत. पोलिसांना सूचित न करता अपघाताचे ठिकाण सोडल्यास परवाना रद्द करणे, तुरुंगवास आणि २० हजार डॉलरपर्यंत दंड होऊ शकतो.
निष्काळजीपणा आणि बेजबाबदार वर्तन
अमेरिका, जपान, नॉर्वे, स्वीडन या विकसित देशांच्या तुलनेत भारत खूप मागे आहे. येथे हिट अँड रनमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. तज्ञांच्या मते, भारतात हिट अँड रन प्रकरणांची संख्या जास्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे निष्काळजीपणा आणि बेजबाबदार वर्तन. बहुतेक लोक रस्त्याचे नियम पाळत नाहीत. जसे सीट बेल्ट लावणे, ओव्हरस्पीडिंग आणि मद्यपान करून गाडी चालवणे.
प्रकरणांची संख्या १७ टाक्यांनी वाढली
केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये हिट अँड रनची १७ टक्के अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. यातील मृतांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी अधिक आहे. जखमींच्या संख्येतही २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००५ पासून भारतात दरवर्षी सुमारे साडेचार लाख रस्ते अपघात होत आहेत. फक्त २०२० मध्ये, जेंव्हा देशव्यापी लॉकडाऊन लागू झाला तेव्हा हा आकडा चार लाखांच्या खाली गेला होता.