22 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रआरोपी अभिनेता साहिल खानची अटकपूर्व जामिनासाठी धाव

आरोपी अभिनेता साहिल खानची अटकपूर्व जामिनासाठी धाव

मुंबई : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या अ‍ॅपचा मालक रवी उप्पल याला अटक करण्यात आली. दुबईतील स्थानिक पोलिसांनी ही कारवाई करत रवी उप्पल याला बेड्या ठोकल्या. आता याच प्रकरणात बॉलिवूडमधूनही मोठी बातमी समोर आली आहे.

बॉलिवूडमधील अभिनेता साहिल खान याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. साहिल खान सध्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यात साहिल खान आरोपी आहे. त्याच पार्श्वभूमीवर साहिल खान याने सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

मात्र मुंबई पोलिसांनी त्याच्या अटकपूर्व जामिनाला विरोध दर्शवला आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात जवळपास १५ हजार कोटींची अफरातफर झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून तपास करण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी महादेव बुक अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी या ३१ जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. यामध्ये ३१ जणांविरुद्ध एफआयआर, तर ३२ क्रमांक अनोळखी लोकांविरुद्ध होता. या प्रकरणाची एफआयआर प्रत बाहेर आल्याने एक धक्कादायक खुलासा झाला. त्यानुसार या एफआयआरमध्ये अभिनेता साहिल खानचेही नाव होते.

या एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक २६ म्हणून अभिनेता साहिल खानचे नाव असल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे अभिनेता साहिल खान याच्यावर महादेव ऑनलाईन अ‍ॅपशी संबंधित आणखी एक बेटिंग अ‍ॅप चालवल्याचा आरोप होता. साहिल खान याने केवळ प्रमोशनच केले नाही तर त्याने अ‍ॅप ऑपरेट करून त्या माध्यमातून प्रचंड नफा मिळवला, असा आरोप लावण्यात आला आहे.

महादेव अ‍ॅप काय आहे?

महादेव अ‍ॅप सट्टेबाजीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. इथे ऑनलाईन सट्टेबाजी केली जात होती. या अ‍ॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण इतर देशांमध्ये हे अ‍ॅप अद्यापही सुरू आहे. छत्तीसगडमधील चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल याला दुबईत बसून चालवत होते. या दोघांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR