हैदराबाद : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशचे दहा वर्षांपूर्वी विभाजन झाले आणि तेलंगण या नव्या राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी प्रादेशिक अस्मितेचा विषय पुढे करून काँग्रेसविरोधात लाट तयार करीत भारत राष्ट्र समितीने तेलंगणात सत्ता काबीज केली; त्यानंतर सलग दोन टर्म केसीआरची सत्ता कायम होती. मात्र, यावेळी कॉंग्रेसने केसीआरला पुन्हा धोबिपछाड देत बीआरएसचा दारुण पराभव केला. राज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी व गांधी घराण्याचा करिष्मा पुन्हा एकदा चालला. यात राज्याचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांचीही जादू चालली. त्यामुळे तेच या निवडणुकीत खरे जायंट किलर ठरले.
भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या मंत्रिमंडळात तसेच महत्त्वाच्या सत्ता केंद्रांवर कुटुंबातील व्यक्ती व सदस्यांची नेमणूक केली आणि त्यांच्या माध्यमातूनच सारा व्यवहार पाहिला. त्या कार्यप्रणालीविरोधात प्रचंड नाराजी तयार झाली. सत्ताधारी आमदारांविरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी असतानाही तीन महिन्यांपूर्वीच भारत राष्ट्र समितीने विद्यमान आमदारांपैकी ९०% जणांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे जनतेत क्षोभ निर्माण झाला. त्याचेच प्रतिबिंब आजच्या निकालात उमटले.
तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर त्यासाठी काम करणा-या चळवळीतील कार्यकर्त्यांकडे सत्ताधारी पक्षाने सातत्याने दुर्लक्ष केले. परिणामी, हे कार्यकर्ते पक्षापासून दुरावले आणि त्यांनी काँग्रेसला साथ दिली. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाने या निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मतांचे विभाजन थांबून ती मते काँग्रेसकडे वळाली. दुसरीकडे मुख्यमंत्री राव यांनी तेलंगणात मोठ्या प्रमाणात ‘रेवडी संस्कृती’ रुजवली. शासकीय योजनांच्या माध्यमातून थेट पैसे देण्याची चटक लोकांना लावली. या रेवडी संस्कृतीमुळे राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली आणि हा प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे महिला, तरुण यांच्यामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. हा रोष एवढा होता, की मुख्यमंत्र्यांना दोनपैकी एका मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला.
काँग्रेसची नियोजनबद्ध आखणी
कर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेसमध्ये आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी तातडीने तेलंगणात लक्ष केंद्रित केले. काँग्रेसने ‘कर्नाटक पॅटर्न’ तेलंगणात अवलंबला. पक्षाने ४४ लाख लोकांना जोडले. त्यांना प्रत्येकी दोन माणसांना जोडण्याचे आणि काँग्रेसमुळे राज्याचे विभाजन होऊन राज्याचे हित कसे साधले गेले, हे मतदारांपर्यंत पोहोचवले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला.
गैरव्यवहारही चव्हाट्यावर
विद्यमान सरकारमधील गैरव्यवहारांचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला. गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी सातत्याने केली आणि त्याला भाजप सरकार कशा पद्धतीने खो घालते, हे मतदारांना यशस्वीपणे पटवून दिले. काँग्रेसने त्यांचे तेलंगणाचे अध्यक्ष रेवंथ रेड्डी यांच्या मागे आपली सर्व ताकद लावली. त्याचा फायदा झाला.
पदयात्रेचाही परिणाम
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रचाराचे नियोजन तसेच ‘भारत जोडो’ यात्रेवेळी मिळालेला प्रतिसाद पाहता त्याच पद्धतीची यात्रा राज्यात काढण्यात आली. त्याचवेळी काँग्रेसने राज्यात ओबीसी कार्ड नियोजनपूर्वक वापरले. प्रचारामध्येही त्याचा वापर अगदी नियोजनबद्धरीत्या केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांपासून अशोक गेहलोत यांच्यापर्यंत सर्वांना तेथे प्रचारासाठी पाठवले. त्यामुळे विजयश्री खेचून आणणे सोपे झाले.