सातारा : दिल्लीतील जंतर-मंतर येथे दि. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ साता-यात युवकांनी मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोवई नाका येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. युनायटेड यूथ फ्रंट ऑफ साताराच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले होते.
संविधानाचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो, इन्कलाब झिंदाबाद, साता-याची युवा शक्ती-परिवर्तनाची नवी क्रांती’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर युवकांनी संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. मोर्चादरम्यान युवकांनी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला लाठीमार हा मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, याची सखोल चौकशी करावी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी आमचा मोर्चा हा पक्षविरहित असून, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही लढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एक आई म्हणून मी या आंदोलनात सहभागी झाले आहे. मी कोणत्याही पक्षाच्या वतीने नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने आणि एक आई म्हणून येथे आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना काय असतील, याची मला एक आई म्हणून जाणीव आहे. या घटना मनाला पिळवटून टाकणा-या आहेत, असे मत आंदोलनात सहभागी झालेल्या शिल्पा मोदी यांनी व्यक्त केले.
पेपर माफियांवर कारवाई करा
खासगी क्षेत्रातील शिक्षणामुळे स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थ्यांसाठी पालक लाखो रुपये कोचिंग क्लासेसवर खर्च करत आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांच्या परीक्षांबाबत मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे आपले पैसे व मेहनत वाया जाऊ नये, अशी त्यांची भावना असते. पेपरफुटी ही अत्यंत गंभीर बाब असून, हा एक मोठा घोटाळा आहे. पेपरफुटी करणा-या पेपर माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
















