नवी दिल्ली : पुढच्या महिन्यापासून देशभरात सणांचा हंगाम सुरू होणार आहे. या सणासुदीच्या काळात तुम्ही दिवाळी, छठ पूजा किंवा इतर सणांसाठी घरी जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला लवकरात लवकर फ्लाइट तिकीट बुक करावे लागेल. कारण, सणासुदीच्या काळात विमानाचीतिकिटे महाग होत आहेत. दिवाळीदरम्यान विमान प्रवासाच्या भाड्यात २५ पर्यंत वाढ होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिवाळीसाठी प्रमुख देशांतर्गत मार्गांवर वन-वे तिकिटाची किंमत १०-१५ टक्के वाढवली जाणार आहे. तसेच, ओणमनिमित्त केरळमधील विमानाचे भाडे २०-२५ टक्के वाढविण्यात आले आहे. ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर काळात दिल्ली-चेन्नई मार्गावरील नॉन-स्टॉप फ्लाइटचे सरासरी वन-वे इकॉनॉमी क्लासचे भाडे २५ टक्क्यांनी वाढून ७,६१८ रुपये झाले आहे. तर, मुंबई-हैदराबाद मार्गावरील तिकिटाची किंमत २१ टक्क्यांनी वाढून ५,१६२ रुपये, दिल्ली-गोवा आणि दिल्ली-अहमदाबाद मार्गावर १९ टक्क्यांनी वाढून ५,९९९ रुपये आणि ४,९३० रुपये झाली आहे. इतर काही मार्गांवरील भाडे १६ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काही मार्गावरील तिकिटांच्या दरात तर सुमारे ६ ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचेही समोर आले आहे.