मुंबई : भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणा-या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजप सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेसाठी लाचार झाले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
लोकसभेने वक्फ दुरुस्ती विधेयकावर बुधवारी मध्यरात्री २ च्या ठोक्याला आपली मोहोर उमटवली. त्यानंतर दुस-या दिवशी हे विधेयक संसदेच्या वरिष्ठ सभागृहात मांडण्यात आले. या सभागृहाने गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास हे विधेयक हातावेगळे केले. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. त्यांची त्यांच्यावर स्वाक्षरी झाली की या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. या विधेयकाला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
अजित पवारांनी चुलत्याचा पक्ष चोरला
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांनी काका शरद पवार यांचा पक्ष भाजपच्या मदतीने चोरून पक्षाचे नाव व चिन्हही घेतले व सत्तेसाठी धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसले. तेव्हापासून ते सातत्याने आपण विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असलो तरी, पुरोगामी विचार सोडला नाही असे बिंबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यांनी एका इफ्तार पार्टीत सहभागी होत मुस्लिम समाजाला त्रास देणा-यांना सोडणार नाही, माफ केले जाणार नाही, अशा वल्गना केल्या. मुस्लिम समाजाच्या पाठीमागे आहे असे सांगून चार दिवस होत नाहीत, तोच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला.
अजित पवारांनी मुस्लीम समाजाला धोका दिला
अजित पवार यांनी हा मुस्लीम समाजाला दिलेला धोका आहे. त्यामुळे अजित पवार यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत हे जनतेने लक्षात घेऊन सावध व्हावे असा इशाराही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.