मुंबई : खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद निवडणूक आयोगासमोर सुरू असून शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप करत आहेत. शुक्रवारच्या सुनावणीत शरद पवार गटाने अजित पवारांच्या कार्यशैलीवर प्रश्न उभे केले. शरद पवारांनी रक्त आटवून पक्षाचा विस्तार केला. अजित पवारांचा पक्षाच्या विस्तारासाठी कुठलाही हातभार नाही. अजित पवारांनी एकदाही पक्षाचे पद उपभोगले नाही, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी अजितदादांवर निशाणा साधला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवारांनी घामाचा एक-एक थेंब गाळून हा पक्ष वाढवला आहे. २००४ मध्ये तोंडातून रक्त वाहत असतानाही प्रचाराला फिरले आहेत. मांडीचे हाड मोडले असतानाही पक्षाचे काम केले. त्याला पक्षासाठी प्राण देणे म्हणतात. अजित पवारांनी आजपर्यंत एकदाही पक्षाचे पद उपभोगले नाही. त्यामुळे पक्ष वाढवण्यात, एका पोराला मोठं करण्यात बापाचे योगदान असते तर शरद पवारांनी पक्षासाठी दिले आहे असे त्यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर राष्ट्रवादी अजित पवार गटानेही पलटवार केला. अजित पवार आणि शरद पवारांनी तुम्हाला राज्यात वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपद देत राज्यात काम करण्याची संधी दिली. आता महाविकास आघाडीत गृहनिर्माणसारखे इतके मोठे पद दिले. परंतु तुम्हाला एवढे सर्व दिले असताना ठाणे, पालघर जिल्ह्यात तुमच्या त्रासाला कंटाळून किती लोक राष्ट्रवादी सोडून गेले आणि तुमचे पक्षवाढीसाठी किती योगदान आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीने अजितदादांच्या नेतृत्वाला बोलणे म्हणजे आकाशाला लाथा मारण्यासारखे आहे असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आव्हाडांना दिले आहे.