अंबरनाथ : प्रतिनिधी
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांनी २३ सप्टेंबर रोजी एन्काऊंटर केला. त्यानंतर शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. परंतु त्याच्या दफनविधीला ठिकठिकाणी विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या एन्काऊंटरला ५ दिवस उलटून गेले तरी अद्याप अन्त्यविधी झालेला नाही.
अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध करण्यात येत आहे. स्मशानभूमीच्या बाजूला शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेधाचा बॅनर लावण्यात आला. अक्षय शिंदेचा अन्त्यविधी होत नसल्याने त्याच्या वकिलांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर त्याच्या अन्त्यविधीची जबाबदारी राज्य सरकारने घेतल होती. तसेच शिंदेचा अंत्यविधी शांततेत होईल, याची पोलीस खबरदारी घेतील, अशी हमीही राज्य सरकारने हायकोर्टात दिली होती. मात्र, अजूनही हा अंत्यविधी झालेला नाही. अक्षयच्या अन्त्यविधीसाठी सरकार जागा देत नाही, असे त्याच्या वकिलाने म्हटले. त्यावरून हा वाद पुन्हा कोर्टात जाऊ शकतो.