28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीय विशेषकेरळमधील धोक्याची घंटा

केरळमधील धोक्याची घंटा

कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या विघातक कृत्याचे मूल्यांकन हे केवळ एखाद्या दहशतवादी हल्ल्यात किती जणांचा मृत्यू झाला, या आधारावर होत नाही. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात कलामसेरीच्या कन्व्हेंशन सेंटर म्हणजेच केंद्रात झालेला स्फोट हा प्रत्येक दृष्टिकोनातून धक्कादायक आणि चिंताजनक आहे. या स्फोटात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून ५१ जण जखमी झाले आहेत. इतिहासात दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या बातम्या वाचून आपली मानसिकता बोथट बनल्यामुळे ही जीवितहानी कमी वाटू शकते; पण त्यामुळे हल्ल्याचे गांभीर्य कमी होत नाही.

यहोवाज विटनेसेस किंवा यहोवा विटनेस समुदायाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात सुमारे २ हजारांच्या आसपास नागरिक सहभागी झाले होते. यावेळी एक नव्हे तर सलग तीन बॉम्बस्फोट घडवून आणले जातात याचा अर्थ हा एक अत्यंत नियोजनबद्ध कट होता. हा स्फोट आयईडी म्हणजेच इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसने झाल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. कोचीचा रहिवासी असणा-या डॉमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने या घटनेची जबाबदारी घेण्यामागचे सत्य काय आहे? तो या स्फोटात एकटाच सहभागी होता का? की अन्य लोकही सहभागी होते? तो जे काही म्हणत आहे, ते खरे आहे की त्यामागे आणखी काही षडयंत्र आहे? राष्ट्रीय तपास यंत्रणा किंवा एनआयए आणि केरळच्या दहशतवादविरोधी पथकाच्या तपासणीतून या प्रकरणातील खरे सत्य बाहेर येईल. त्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. तोवरच केरळ सरकारने कोणताही विचार न करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला याबाबत जबाबदार धरणे यामागे केवळ राजकारण आहे.

यहोवा विटनेस हा ख्रिश्चन धर्मातील समुदाय आहे. त्याचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे वॉव्रिक येथे आहे. सध्या जगभरात या समुदायाचे ५० लाख सदस्य असल्याचे सांगितले जाते. त्यास ‘इंटरनॅशनल बायबल स्टुडंट्स असोसिएशन’ची संस्था मानली जाते. त्याची स्थापना चार्ल्स टेज रसेल यांनी १८७२ मध्ये पीट्सबर्ग येथे केली होती. त्यांच्या प्रथा, परंपरा आणि मान्यता या ख्रिश्चन धर्मापेक्षा वेगळ्या आहेत. हे यहोवा नावाच्या ईश्वराला मानतात आणि जगाचा अंत जवळ आला आहे, असे ते मानतात. कॅथोलिक प्रोटेस्टंट आदीपासून त्यांचे विचार वेगळे आहेत. हा समुदाय स्वत:ला ख्रिश्चियन मानतो. पण ख्रिसमस आणि ईस्टर यांसारख्या सुट्या मानत नाही. या गटाचे सामाजिक नियम आणि परंपरा बरेच कडक आहेत. घटस्फोट घेणे आणि रक्त घेणे देखील या समूहामध्ये निषिद्ध मानले आहे. साहजिकच अन्य ख्रिश्चन समुदायाशी त्यांचे संबंध ताणलेले असतात.

ही मंडळी आपल्या विचारांचा प्रसार करून अन्य गटाला आपल्यासमवेत घेण्याचा प्रयत्न करत असतात. बरेचदा त्यामुळे देखील तणाव निर्माण होतो. केरळमध्ये सुमारे तीन दशकांपूर्वी या समूहांतील तीन मुलांवर त्यांच्या शाळेत राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती आणि हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेले होते. हा समुदाय आपल्या विस्तारासाठी वादग्रस्त मते मांडत राहतो आणि त्यामुळे भारतविरोधी किंवा भारतीय संस्कृती, परंपरा आदींवर टीका करणे आणि त्याचा शेवट करणे यांसारखी आक्षेपार्ह मते मांडली जातात. केरळच्या चर्चमधील अशा काही घटना देखील समाजात अस्वस्थता निर्माण करणा-या ठरल्या आहेत. मार्टिनने ताज्या स्फोटांनंतर सहा मिनिटांचा एक व्हीडीओ जारी केला आणि त्यात म्हटले, या संघटनेकडून दिले जाणारे शिक्षण हे देशद्रोही आहे. त्यांची विचारसरणी धोकादायक आहे आणि त्यामुळे राज्यातून हा विचार संपवावा लागेल. त्याच्या मते, अनेकदा संघटनेला आपला विचार बदलण्यास करण्याचे सांगितले, मात्र तसे घडले नाही. शेवटी आपल्याकडे कोणताही पर्याय नव्हता आणि म्हणून हा निर्णय घेतला. यहोवा विटनेसने त्यास नोंदणीकृत सदस्य मानण्यास नकार दिला आहे. ज्या रीतीने डॉमिनिक मार्टिन मते मांडत आहेत ते पाहता त्याचा संबंध या समुदायाशी आहे असे वाटत नाही.

गेल्या काही काळापासून केरळमध्ये हिंसा माजविणा-या धार्मिक कट्टरपंथीयांच्या हालचाली चिंताजनक पातळीवर वाढल्या आहेत. इस्रायल अणि हमास युद्धानंतर तर देशातील वातावरण ब-याचअंशी संतप्त आणि तणावाचे निर्माण झाले आहे. केरळमध्ये दररोज कोठे ना कोठे रेल्वे रोको आंदोलन किंवा मोर्चे निघत आहेत. या स्फोटाच्या एक दिवस अगोदर केरळमध्ये एका रॅलीला हमासचा माजी म्होरक्या खालिद मशालने व्हर्च्युअली भाषण केले. तो म्हणाला, बुलडोझर, हिंदुत्व आणि यहुदीवाद नष्ट करायचा आहे. अर्थात या स्फोटाचा त्याच्याशी संबंध असो किंवा नसो, स्थिती चिंताजनक आहे. परदेशात बसून दहशतवादी संघटनेचा माजी प्रमुख ऑनलाईनच्या माध्यमातून भारतातील एका रॅलीत बोलतो आणि चिथावणी देतो ही बाब आपल्या सुरक्षेला आव्हान देणारी आहे. यापुढची गंभीर गोष्ट म्हणजे त्याच्या भाषणाला उपस्थित नागरिक टाळ्याही वाजवतात. केरळ सरकारने त्याची दखल घेऊन कारवाई करायला हवी होती. परंतु अशी कृती न केल्याने अशा समाजकंटकांना केवळ अभय मिळत नाही तर हिंसेची मानसिकता बाळगणा-या लोकांचा आत्मविश्वास आणखीच दुणावतो.

– व्ही. के. कौर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR