मुंबई : गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत जागावाटपाबाबत चर्चा झाली असून सर्वांसाठी सन्मानपूर्वक जागावाटप केली जाईल, एवढीच चर्चा यावेळी झाली. याबाबत स्वत: गृहमंत्री अमित शाह जागावाटपासाठी आवश्यकता असेल तेव्हा वेळ देतील, अशी माहिती सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी सुनील तटकरे यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसीय मुंबई दौरा संपल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आतली बातमी सांगितली असून अमित शाह रविवारी रात्री मुंबईत आले. अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची काल रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. तसेच अमित शाह यांनी आज दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी जावून गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं तरी अजित पवार त्यांच्या भेटीसाठी गेले नाहीत.
अमित शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. पण अजित पवार तिथे दिसले नाही. याबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर अमित शाह दिल्लीत परतत असताना अजित पवार यांनी मुंबई विमानतळावर जावून त्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. दरम्यान, अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत जागावाटपाबाबत काय चर्चा झाली? याबाबत अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले नेते सुनील तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
यावेळी सुनील तटकरे यांना जागावाटपाबाबत सध्या सुरु असलेल्या विविध चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी ‘‘आम्ही प्रत्याक्षात जागावाटपाबाबत चर्चा केली तेव्हा अशी चर्चा झालेली नाही. एकदा आम्ही नागपूरमध्ये चर्चा करण्यासाठी बसलो होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, मी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आम्ही सर्व चर्चा करण्यासाठी बसलेलो होतो.
सर्व जागा महायुती लढवणार
कोणत्याही परिस्थितीत सर्व २८८ जागा महायुतीने लढवायच्या आणि पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आणायचे, बहुमत मिळवायची, अशी आमची चर्चा झाली होती. जागावाटपाच्या चर्चा नक्कीच प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करेल. आम्ही योग्यवेळी त्याबाबत प्रखरपणाने चर्चा करु. जागावाटपाबाबत सर्वा अंतिम निर्णय दिल्लीतच होणार आहे. ज्यावेळेला आवश्यकताा असेल त्यावेळी नक्तीच बैठक होईल असे सुनील तटकरे यांनी सांगितले.