34.7 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeमहाराष्ट्रअमित शहा २ दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर

अमित शहा २ दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर

मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २ दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर येत आहेत. शनिवारी ते रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खा. सुनिल तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत. त्यामुळे अमित शहा यांच्या या दौ-यात रायगड जिल्हयाच्या पालकमंत्रीपदाचा वाद देखील सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर येत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी उशीरा ८ वाजता त्यांचे पुणे येथे आगमन होईल. त्यानंतर शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाउंच्या समाधीचे दर्शन घेतील. नंतर ११ वाजता ते रायगड किल्ल्याला भेट देतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते वंदन करतील. नंतर किल्ल्यावर त्यांच्या उपस्थितीत काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दुपारी २ वाजता ते सुतारवाडी येथील सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. दुपारचे जेवण ते तटकरेंच्या घरीच करतील. त्यानंतर साडेतीन वाजता अमित शहा यांचे मुंबईत आगमन होईल. मुंबईत साप्ताहिक चित्रलेखाच्या विलेपार्ले येथील कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असणार आहे. रात्री ते सहयाद्री अतिथि गृह येथे येतील.

पालकमंत्रीपदाचा वाद सुटण्याची शक्यता!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी रोजी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली होती. त्यात रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना तर नाशिकसाठी गिरीश महाजन यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले हे नाराज झाले. गोगावले समर्थकांनी रायगडमध्ये आंदोलनही केले. नाशिकचेही पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाला हवे आहे.

नाशिकसाठी शिंदे गटाचे दादा भुसे इच्छुक आहेत. या नाराजी नाट्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती. त्यावर अदयापही निर्णय झालेला नाही. या निर्णयाचा चेंडू आता अमित शहा यांच्या कोर्टात पोहोचला आहे. अमित शहा हे सुनिल तटकरे यांच्या घरी भोजनास जाणार असल्याने गोगावले समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण अमित शहा हे सारासार विचार करूनच निर्णय घेतील अशी आशा सगळ्यांना आहे. दरम्यान, मुंबई भेटीत अमित शहा हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याचीही शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR