मुंबई : देवेंद्र फडणवीस म्हणजे लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस, ज्याला तुम्ही कुठलीतरी खोली म्हणताय ती बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. मातोश्रीमध्ये नाक रगडत आलेले अमित शाहांनी त्यावेळी त्याच खोलीत तुम्हाला नो एन्ट्री केली होती अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरेंना वेड लागले असून अमित शाहांनी त्यांना कुठल्यातरी खोलीत मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचा दावा करतात अशी टीका फडणवीसांनी केली होती. त्याला उद्धव ठाकरेनी प्रत्युत्तर दिले.
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्यासाठी ब-याच खोल्या असतील, त्यामध्ये तुम्ही काय करता हे आम्ही बघू इच्छीत नाही. पण तुम्ही ज्याला कुठलीतरी खोली म्हणता ती मातोश्रीमधील बाळासाहेबांची खोली आहे, ते आमच्यासाठी मंदिर आहे. त्याच खोलीत अमित शाह नाक रगडायला आले होते. त्याच खोलीत अमित शाहांनी तुम्हाला नो एन्ट्री केली होती, तू बाहेर बस असे अमित शाहांनी तुम्हाला सांगितले होते. त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते, गोपीनाथ मुंडे आले होते, प्रमोद महाजन आले होते. ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. तिला तू नालायक माणसा, कुठलीतरी खोली म्हणतोय. कधी कुठे जाताना, चांगलं काम करताना आम्ही त्या खोलीत जाऊन बाळासाहेब, माँसाहेबांसमोर नतमस्तक होतोय. उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मला भ्रमिष्ठ म्हणाले. पण मी भ्रमिष्ठ आहे की नाही ते ठरवतील. फडणवीस, जनाची नाही तरी मनाची ठेवा. हे दोन्ही तुमच्याकडे नाही ते आम्हाला माहिती आहे. लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस. आदित्यला मुख्यमंत्री करतो अस फडणवीस म्हणाले होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मला म्हणाले की आदित्यला ग्रुम करतो, अडीच वर्षानंतर त्याला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो. मी म्हणालो, तो वयाने लहान आहे, त्याच्या डोक्यात काहीतरी घालू नका. आमदार म्हणून त्याला काम करू द्या. आणि समजा आदित्यला मुख्यमंत्री केलात तर तुम्ही त्याच्या हाताखाली काम करणार का? त्यावर आपण दिल्लीला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. आपल्याला अर्थव्यवस्थेमधील कळते असेही ते म्हणाले होते.
तुमच्या चेल्याचपाट्यांना गावबंदी केली
उद्धव ठाकरे म्हणाले की आज तुमच्यासमोर लोकांनी रान पेटवले आहे, तुमच्या चेल्या चपाट्यांना गावबंदी केली आहे. अशोक चव्हाणांना गावबंदी केली आहे. आता अशोक चव्हांणांना वाटत असेल की काँग्रेसमध्ये होतो तेच बरे होते. नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला २०१४ साली सांगितलं होतं की पाच वर्षांनी तुमच्या हातात या काही गोष्टी असतील. २०१९ साली पुढच्या पाच वर्षात या गोष्टी असतील. आता २०४७ साली सांगतात या गोष्टी असतील.