18.1 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरघराचा पाया खोदताना आढळले पुरातन घर

घराचा पाया खोदताना आढळले पुरातन घर

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील घटना पूर्वी आढळल्या होत्या मूर्त्या

जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सराफ गव्हाण या गावात एक अनोखी घटना समोर आली आहे. घराचे बांधकाम करण्यासाठी पाया खोदत असताना याठिकाणी जुन्या काळातील घर आढळून आले आहे. हे बांधकाम १५० वर्ष जुने असण्याचा अंदाज आहे.

पुरातन काळातील विटा आणि जुन्या काळातील हे बांधकाम असून पूर्वीच्या काळी धान्य साठवण्यासाठी असलेले कोठार असण्याची शक्यता गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही सराफ गव्हाण या गावामध्ये पुरातन मूर्ती आढळून आल्या होत्या. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने गावात आढळलेल्या पुरातन बांधकामाचा शोध घ्यावा, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगावजवळ असलेल्या सरफगव्हाण गावातील गणेश चव्हाण यांनी सहा महिन्यापूर्वी घर बांधकाम करण्यासाठी गावातीलच एक जागा खरेदी केली होती. या जागेवर अगोदर केवळ पत्रे टाकलेले मोडकळीस आलेले घर होते. चव्हाण यांनी नवीन घर बांधण्यासाठो जेसीबीद्वारे गुरुवारी पायाचे खोदकाम सुरु केले होते. खोदकाम ६ ते ७ फुटावर गेले असता, जेसीबी चालकाला काही विटांचे बांधकाम दिसून आले.

त्याने जेसीबी थांबवून कुतुहलाने काही विटा हटवून पाहिले असता, तिथे चक्क जुन्या वीट व पांढरी मातीने बांधकाम केलेली एक अख्खे घर निदर्शनास आले. घराचे बांधकाम करण्यासाठी पाया खोदत असताना या ठिकाणी हे बांधकाम आढळून आले आहे. या बांधकामाविषयी गावक-यांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क असले तरी पूर्वीच्या काळी धान्य साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली लादनी किंवा बळद असण्याची शक्यता असल्याचे गावकरी प्रल्हाद बादलकर यांनी सांगितले.

पुरातत्व विभाग पाहणी करणार
या घटनेची माहिती मिळताच घनसावंगीचे गटविकास अधिकारी, पोलिसांची टीम येथे पाहणी करून गेली असून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार करून भारतीय पुरातत्व विभागालाच ते सादर करणार आहेत. त्यानंतर पुरातत्व विभागाची टीम येथे येऊन पाहणी करणार आहे, तोपर्यंत हे बांधकाम सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे अशी माहिती गावकरी गिरी यांनी सांगितले.

अधुनमधून मुर्त्या आढतायेत
सराफगव्हाण गावाला पूर्व इतिहास नसला किंवा फारसा कोणाला माहीत नसला तरी, गावात चार बुरुज असलेली एक मोठी मातीची गढी होती. कालातराने ती ढासळली. तसेच गावात यापूर्वी सुद्धा एका पुलाचे खोदकाम करताना देवाच्या काही पुरातन मूर्ती सुद्धा आढळून आल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR