सोलापूर : महापालिका आणिभूमिअभिलेख कार्यालयातील वादामुळे गुंठेवारी क्षेत्रातील बांधकाम परवान्याचे ५०० हून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. जागेच्या मोजणीचे ७००हून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. जागेचा मोजणी नकाशा कसा प्रमाणित करायचा याचा तिढा सुटल्यानंतर हे परवाने निकाली निघतील, असे बांधकाम परवाना विभागप्रमुखांनी सांगितले.
मनपा क्षेत्रात एप्रिल २०२१ मंजूर ले-आउटमधील बांधकाम परवाने ऑनलाइन दिले जातात. गुंठेवारी जागांच्या बांधकाम परवान्यांसाठी एप्रिल २०२१ पासून नवी नियमावली निश्चित केली.
गुंठेवारी भागातील परवाने ऑफलाइन स्वीकारले जातात.अर्जासोबत मिळकतदाराने भूमीअभीलेख कार्यालयातून जागेचा मोजणी नकाशा सादर करणे बंधनकारक आहे. उत्तर सोलापूर भूमिअभिलेख कार्यालयाने सुरुवातीला नकाशे तयार करून दिले. मात्र, सहा महिन्यांपासून यासाठी नवी अट घातली. ही अट अर्जदारांसाठी अडचणीची ठरली आहे.
गुंठेवारी जागेचा मोजणी नकाशा, हद्द नकाशा असेल तर खरेदी-विक्री व्यवहार करणे बंधनकारक आहे. आम्ही फेब्रुवारी महिन्यात मोजणी नकाशासाठी अर्ज केला होता. त्यावेळी मागील सहा महिन्यांपासून अर्ज प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. जवळपास ७०० पेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत. प्रशासनाकडून यावर निर्णयच झालेला नाही. या कारणास्तव या जागांची विक्री थांबल्याचे पूर्व भागातील नागरिक अविनाश आडम यांनी सांगितले.
सहा महिन्यांपूर्वी गुंठेवारी जागेचा नकाशा आर्किटेक्चरकडून थेट भूमिअभिलेख कार्यालयात सादर केला जायचा. भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी जागेची मोजणी, हद्द निश्चित करून मोजणी नकाशा द्यायचे. आता जागेचा प्राथमिक नकाशा महापालिकेनेच मंजूर करून द्यावा. त्यानंतरच आम्ही मोजणी करून देऊ, अशी भूमिका भूमिअभिलेख कार्यालयाने घेतली आहे. गुंठेवारी जागेचा मोजणी नकाशा प्रमाणित कसा करून घ्यायचा, यासाठी इतर मनपाकडून मार्गदर्शन घेतले जात आहे. यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी मनपा आयुक्तांकडे प्रस्ताव दिला आहे. यावर निर्णय झाल्यानंतर नकाशांचे विषय मार्गी लागतील.असे नगररचना, मनपा सहायक संचालक संभाजी कांबळे यांनी सांगीतले.