छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यामुळे चाराटंचाईत पशुधन जगविण्यासाठी शेतक-यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत दुधाचे दर २५ रुपये प्रति लिटरपर्यंत घसरल्याने दुध उत्पादक शेतक-यांनी गुरूवारी बीड रोडवरील आडगाव फाटा येथे अंगावर दुध ओतून घेत सरकारचा निषेध केला. दुधाला प्रती लिटर ४० रुपये भाव द्या, अशी मागणी शेतक-यांनी केली.
गेल्या काही वर्षांपासून चारा आणि ढेपचे दर सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत दुध उत्पादनचा खर्चही प्रति लिटर ३५ रुपयांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे मात्र दुधाचे दर सतत घटत आहे. आज दुधाला प्रती लिटर २५ रुपये दर मिळत असल्याने दुध विक्री व्यवसाय संकटात सापडला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या आडगाव आणि परिसरातील दुध उत्पादक शेतक-यांनी गुरूवारी बीड रोडवरील आडगाव येथे आंदोलन केले. दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव द्यावा, अशी मागणी करीत शेतक-यांनी दूध अंगावर ओतून घेतले.
यावेळी शेतक-यांनी दुधाला ४० रुपये लिटर भाव द्या, अशा घोषणा केल्या, राज्यसरकारचा निषेधाच्या घोषणा यावेळी दिल्या. न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतक-यांनी दिला. आज आम्ही दूध सांडले उद्या रक्त सांडू आंदोलन करू असा इशाराचा त्यांनी दिला. या आंदोलनात आडगाव बुद्रुकचे शेतकरी नेते जगदीश पाटील डवले, गणेश पाटील हाके, विलास पाटील शेळके, बापू दसपुते, हरिभाऊ लोखंडे, शिवाजी डवले सोपान ढाकणे, अशोक माने, विष्णु दसपुते, परमेश्वर साळुके, श्रीमंत पठाडे आणि राजु हाके यांनी सहभाग घेतला.